पुरस्काराने किर्ती वाढते तशी जबाबदारीही वाढते. समाजाला चांगल्या, निस्वार्थी लोकांची मोठी आवश्यता आहे.माणसांच्या आनंदापेक्षा जो त्याच्या दुःखात सहभागी होतो तो खरा लोकप्रतिनिधी, असे प्रतिपादन आमदार राहुल ढिकले यांनी केले. त्यांच्या हस्ते सुप्रेम मेडिकल फाऊंडेशन आणि रोटरी क्लब आयोजित विविध मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यात प्राचार्या डॉ. प्रतिमा वाघ, लोकमतचे पत्रकार मनोज मालपाणी,डॉ. बाळकृष्ण शेलार, बंटी भागवत आदींचा समावेश आहे.
माहेश्वरी भवनमध्ये रविवारी ( दि. २८ ) ‘नाशिक रोड रत्न पुरस्कार’ प्रदान केल्यानंतर आमदार ढिकले बोलत होते. रोटरी क्लबचे डिस्ट्रीक्ट गर्व्हनर ज्ञानेश्वर शेवाळे, फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत भुतडा, माजी नगरसेवक संभाजी मोरूस्कर, अचल राजे, प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी व्यासपीठावर होते.
कै. प्रा. भालचंद्र जोशी (जीवनगौरव पुरस्कार), लोकमतचे मनोज मालपाणी (पत्रकारिता), डॉ. बाळकृष्ण शेलार, डॉ. कृष्णा शहाणे, डॉ. प्रतिभा वाघ, किसनराव निकम (शिक्षण क्षेत्र), सुनील ढगे (कला, सांस्कृतिक) डॉ. पूनमचंद ठोळे (वैद्यकीय), सिक्युरिटी प्रेस एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी (उत्कृष्ट संस्था-जगदीश गोडसे, ज्ञानेश्वर जुंद्रे), विकास भागवत (सामाजिक), संजय कटाळे (प्रशासकीय),कै. सत्यभामा गाडेकर (राजकीय क्षेत्र), श्रीपाद बाजपेयी (विशेष पुरस्कार) यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. गाडेकर यांच्यावतीने योगेश गाडेकर यांनी तर भालचंद्र जोशींच्यावतीने प्रवीण जोशींनी पुरस्कार स्वीकारला.
ज्ञानेश्वर शेवाळे म्हणाले की, पुरस्कार्थी हे समाजाचे विविध अंग आहेत. त्यातूनच समाज तयार होतो. योग्य उद्देश, जिद्द, अधिकार, कार्यक्षमता, सकारात्मकता, सत्याचा अंश, मित्र व कुटुंबाची साथ हे यशाचे गमक आहे.
डॉ. प्रशांत भुतडा म्हणाले की, नाशिक रोडच्या गुणवंतांना न्याय देण्यासाठी दिवंगत डॉ. सुरेश भुतडा यांच्या नावे सुरू केलेल्या या पुरस्काराचे हे १४ वर्ष आहे. सामाजिक कार्य करण्यासाठी सुप्रेम फाऊंडेशन भविष्यातही कटीबध्द राहील.महेश सेवा समितीचे सहकार्य या कार्यक्रमास लाभले. संयोजन डॉ. सुषमा भुतडा, डॉ. सुशील पारख, डॉ. रेश्मा घोडेराव, डॉ. क्षितीजा गायकवाड, प्रशांत कापसे, रविंद्र मालुंजकर, महेश कलंत्री, कल्पना बोंडे, डॉ. कांचन लोकवणी, डॉ. शीतल पटणी, नेहा झंवर, शशीकांत चव्हाण, डॉ. रुहान भुतडा, यांनी केले. विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.