मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतक-यांची मोठी हानी झाली आहे. शेतकरी व सामान्यांच्या मदतीसाठी नाशिक रोड येथील ब्रिटीशकालीन आयएसपी-सीनएपी प्रेसने मदतीचा हात पुढे केला आहे. प्रेसमधील सुमारे चार हजार कामगार प्रत्येकी एक हजार रुपये या महिन्यात देणार असून हा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला जाईल, अशी माहिती प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे आणि कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी दिली.
प्रेस कामगारांनी समाजसेवेचा वारसा अनेक दशकांपासून जपला आहे. या आधी प्रेसने विविध राष्ट्रीय आपत्तीवेळी एक दिवसाचा पगार देऊन लाखो रूपयांची मदत केली आहे. केरळची सुनामी, गुजरात आणि किल्लारी भूकंप, आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबांना मदत, दुष्काळग्रस्तांना तसेच उत्तराखंडातील पूरग्रस्तांना मदत केली होती. कोरोना काळातही लाखो रूपयांची मदत केली होती. मजदूर संघाचे उपाध्यक्ष रामभाऊ जगताप, कार्तिक डांगे, प्रवीण बनसोडे, डॉ. चंद्रकांत हिंगमिरे, अविनाश देवरूखकर, संतोष कटाळे, अशोक पेखळे, नंदू कदम, बबन सैद मनोज सोनवणे, भूषण मेढे, बाळू ढेरिंगे, सुभाष ढोकणे, अण्णा सोनवणे हे आपदग्रस्तांना मदतीसाठी नियोजन करत आहेत
प्रेसच्या सीएसआर फंडातून मदत
नामको रूग्णालयास सव्वा कोटीची अद्ययावत कॅन्सर व्हॅन, जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना एकूण ४५ घंटागाड्या, सिन्नर व इगतपुरीत वाचनालयास प्रत्येकी ६५ लाख रुपये, महापालिकेच्या दिव्यांग शाळेस आणि नाशिक प्रबोधिनाला स्कूल बस दिली होती. बिटको रूग्णालयातील सव्वा तीन कोटींची रक्तपेढी आणि सीटी स्कॅन मशिन दिले. जिल्हा रूग्णालयात दूध बॅंकेसाठी ४५ लाख रुपये दिले होते. नोटबंदी काळात वर्षभर सुटी न घेता देशाला कोट्यवधी नोटांची अखंडपणे छपाई करून दिली होती. करोना काळात प्रेस कामगारांनी जीवाची बाजी लाऊन काम सुरूच ठेवले. या लाटेत शंभरावर कामगार मृत्यूमुखी पडले होते.