शासनाने राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांना ऊर्जितावस्थेत आणावे, यासाठी कृषी विभागात नवे धोरण राबवावे. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी असलेले निवेदन मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष खंडेराव मेढे यांनी नवनिर्वाचित कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दिले.
कृषिमंत्री अँड. माणिकराव कोकाटे हे अधिवेशनानंतर प्रथमच जिल्हा दौऱ्यावर आले असता, मनसेचे खंडेराव मेढे यांनी त्यांची भेट घेऊन सत्कार केला. यावेळी झालेल्या चर्चेत व दिलेल्या निवेदनात शेतकरी आत्महत्या विषयावर चर्चा करण्यात आली. त्यात कृषी मंत्रालय व त्या अंतर्गत येणाऱ्या विविध संस्था, विद्यापीठे यांची अवस्था अतिशय दयनीयझालेली आहे. शेतकरी अवघ्या पाच हजार रुपयांच्या क्षुल्लक कर्जापोटी आत्महत्या करत आहेत. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची तर मालिकाच सुरू आहे.
शेतमालाला योग्य भाव नाही
सोयाबीन, कापूस, ज्वारी, बाजरी, भात शेतीची अवस्था अतिशय बिकट आहे. यासाठी हमीभाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी अनेक आंदोलने केलेली आहेत. शेतकऱ्याच्या भाजीपाल्यालाही योग्य भाव मिळत नाही म्हणून शेतकरी हवालदिल आहेत. अशा परिस्थितीत आपण कृषिमंत्री पदाचा काटेरी मुकुट डोक्यावर घातलेला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव, आधुनिक शेती, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील आणि यशस्वी कृषिमंत्री व्हायचे असेल, तर महाराष्ट्रातील सर्व कृषी विद्यापीठांना ऊर्जितावस्थेत आणून त्यातून पदवी घेऊन उत्तीर्ण झालेल्या शेतकऱ्याला आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण देणे गरजेचे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.