नाशिक शहरातील मध्य नाशिक आणि नाशिक पूर्व मतदार संघापैकी कोणताही एक मतदार संघ काँग्रेस पक्षाला सोडावा, असा सूर स्थानिक पदाधिकाऱ्यांचा आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मध्य नाशिकची जागा सोडणार असेल तर नाशिक पूर्वची जागा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला सोडावी, अन्यथा शहरात काँग्रेस पक्षाला एकही जागा मिळणार नाही, शहरातील काँग्रेसचे अस्तित्वच धोक्यात येईल, असा सुर रविवारी ( दि.२० ) नाशिक रोड परिसरात आयोजित केलेल्या मिसळ पार्टीत उमटला.
मिसळ पार्टीचे संयोजन काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विजय राऊत, नाशिकरोड काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष दिनेश निकाळे यांनी केले. मुक्तिधाम येथील साई पॅलेस रेस्टॉरंट मध्ये मिसळ पार्टी झाली. याप्रसंगी मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी एकमुखाने नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला सोडण्यात यावा, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा हा पारंपारिक मतदार संघ आहे. राजाराम पानगव्हाणे, उद्धव निमसे, गणेश उनव्हणे,यांनी यापूर्वी या विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवलेली आहे. त्यांना अपेक्षित मतदान देखील झाले आहे. नाशिक पूर्व मतदार संघात पक्ष जिवंत ठेवायचा असेल, तर सर्वांनी एक मुखाने नाशिक पूर्व मतदार संघ राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वाट्याला सोडावा, अशी मागणी पुढे करायला पाहिजे, अन्यथा या मतदारसंघात काँग्रेस पक्ष जिवंत राहणार नाही, अशी खंत देखील यावेळी एका महिला पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली.
लोकसभेप्रमाणे नाशिक पूर्व मध्ये इतिहास घडवावा : इच्छूक उमेदवार विजय राऊत यांची मागणी
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना प्रामाणिक मदत केली. त्यांना मोठ्या फरकाने निवडून आणण्यामध्ये काँग्रेसचा हातभार लागला. लोकसभेत इतिहास घडला, त्याप्रमाणेच नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात इतिहास घडू शकतो. महाविकास आघाडीने ही जागा राष्ट्रीय काँग्रेसला सोडावी, आमचा पक्ष ज्या इच्छुकास उमेदवारी देईल.त्याला निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी प्रामाणिक प्रयत्न करावा आणि पुन्हा एकदा लोकसभेप्रमाणे इतिहास घडवावा, अशी मागणी नाशिक पूर्व मतदार संघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले विजय राऊत यांनी केले.