26.5 C
Nashik
Wednesday, November 4, 2026
spot_img

नाशिकरोडमध्ये स्वीकृत नगरसेवक निवडीवरून शिवसेनेत आनंदोत्सव, भाजपमध्ये नाराजी !

418 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

नाशिक शहरातील स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीची अनेक दिवसांपासून लागून राहिलेली उत्सुकता अखेर गुरुवारी (दि. ४) संपुष्टात आली. या निवडीत नाशिकरोड विभागातून शिवसेनेच्या शिंदे गटाचे विनायक (बाबुराव) आढाव आणि चंद्रकांत (राजू) लवटे, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे हेमंत (कुमार) गायकवाड यांना संधी मिळाली. त्यामुळे दोन्ही शिवसेना गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे, भाजपचे ॲड. सुनील आडके आणि शांताराम घंटे यांना संधी न मिळाल्याने भाजपच्या गोटात नाराजी व्यक्त होत असल्याचे चित्र आहे.

…अखेर न्याय मिळाला

शिवसेना शिंदे गटाचे नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष विनायक ( बाबुराव ) आढाव यांचे शिवसेना शिंदे गटातर्फे नाव जाहीर होताच त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला. मागील अनेक वर्षापासून ते सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे. यापूर्वी त्यांनी महापालिकेच्या शिक्षण मंडळावर काम केले आहे. त्यांनी महापालिकेची निवडणूक देखील लढवलेली आहे. त्यात त्यांना यश मिळाले नाही. परंतु स्वीकृत नगरसेवक पदावर त्यांना संधी मिळणार असल्याने त्यांचे कार्यकर्ते गहिवरलेले दिसतात.

लवटेंच्या राजकारणाला संजीवनी

नाशिक जिल्हयाची जबाबदारी यशस्वीपणे पेलवत शिवसेना शिंदे गटासोबत ठामपणे उभे राहून पक्षाचे ध्येय धोरणे सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम करून पक्ष वाढीला चालना देणारे चंद्रकांत लवटे यांना देखील पक्षाने स्वीकृत नगरसेवक पदावर काम करण्याची संधी दिली. त्यामुळे देवळाली गावात त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे व जल्लोषाचे वातावरण आहे. पक्षासोबत प्रामाणिक राहिल्यामुळे लवटे यांना त्यांच्या कामाची पावती मिळाल्याचे दिसते.

निष्ठेचे फळ पुत्राला

महापालिकेच्या निवडणुकीत शहरात सर्वत्र भाजपची लाट होती. नाशिकरोड भागात ती रोखण्यात यश मिळविले. यामागे शिवसेना उबाठाचे ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड यांची भूमिका निर्णायक ठरली. अचूक व्यूहरचना, मोर्चेबांधणी केल्यामुळे नाशिकरोडला भाजपची लाट थोपविण्यात शिवसेना उबाठाला यश मिळाले.अन्यथा भाजपने एकतर्फी, घवघवीत यश प्राप्त केले असते. यात शंका नाही. परिणामी त्यांचे पुत्र हेमंत गायकवाड यांना पक्षाने स्वीकृत नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली. दत्ता गायकवाड यांना एकनिष्ठतेचे फळ मिळाल्यास वावगे ठरणार नाही.

… अहो, न्याय देता का न्याय

अन्यायावर अन्याय सहन करणारे भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते ॲड. सुनील आडके यांच्यावर भाजपने पुन्हा एकदा अन्याय केलेला दिसतो. अन्याय आणि ॲड. आडके असे जणुकाही राजकीय समीकरणच त्यांच्या बाबतीत ठरलेले वाटते. अन्याय सहन करायला देखील काही सीमा असतात. त्या सर्व सीमा ॲड. सुनील आडके यांनी पार केलेल्या दिसतात. कुठे नेऊन ठेवलाय भाजप आमचा. असा वाक्यप्रचार करण्याची वेळ भाजपच्या निष्ठावंतावर आलेली दिसते. अन्यायावर अन्याय सहन करणाऱ्या ॲड. आडके यांना भाजप न्याय कधी देणार यासाठी अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे दिसते.

घंटे समर्थकांचा अपेक्षाभंग

नाशिकरोड मंडळात बाजीराव भागवत यांच्या नंतर शांताराम घंटे यांनी भाजपचा विस्तार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू ठेवला आहे. भाजपचे ध्येय व धोरणे पोहोचवण्याचे काम ते सातत्याने करताना दिसतात. कार्यकर्त्यांची एक फळी त्यांनी निर्माण केलेली आहे. भारतीय जनता पार्टी कडून देशात राबविणारे कार्यक्रम,उपक्रम ते नाशिक रोड मध्ये राबवताना दिसतात. त्यात ते मागे हटत नाही. यानिमित्ताने भाजपचे नाव घराघरात पोहोचवण्याचे काम ते सातत्याने करीत आहे. स्वीकृत नगरसेवकाच्या शर्यतीत त्यांचे नाव आघाडीवर होते. नगरसेवक पदावर निश्चितपणे त्यांची निवड होईल असे वातावरण होते. त्यांच्या समर्थकांना देखील अपेक्षा होती. परंतु त्यांचा पुरता अपेक्षाभंग झाल्याचे दिसून आले. भाजपने नाशिक रोड परिसरात कुणालाही स्वीकृत नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली नाही. परिणामी नाशिक रोड परिसरात भाजपमध्ये संतापाची वातावरण निर्माण झालेले दिसते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles