महानगरपालिकेच्या बिटको रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे गरीब रुग्णांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रुग्णालयातील उपलब्ध असणाऱ्या औषधांच्या व्यतिरिक्त औषधे लिहून दिली जात असल्याने रुग्णांना येथील खाजगी मेडिकल स्टोअर्स मधून औषधे खरेदी करण्यास भाग पाडले जात आहे. असा गंभीर आरोप शिंदे गटाच्या शिवसेनेचे नितीन खर्जुल यांनी केला आहे.
याविषयी अधिक माहिती देताना खर्जुल यांनी सांगितले की,डॉक्टरांनी लिहून दिलेल्या दहा औषधांपैकी सात औषधे रुग्णालयात उपलब्ध आहे. परंतु आवारात असलेल्या मेडिकल स्टोअर्स मधून सर्व औषधे घेण्याचा सल्ला दिला जातो आहे.परिणामी गोर गरीब रुग्णांना अर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. याप्रश्नी प्रशासन याकडे डोळेझाक करीत असल्याचे खर्जुल यांनी म्हटले.याप्रश्नी खर्जुल यांनी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शिल्पा काळे यांची भेट घेत हा प्रकार निदर्शनास आणून दिला आहे. यावेळी डॉ. काळे यांनी दोन ते तीन दिवसांत ही अनियमितता थांबवली जाईल, असे आश्वासन दिले आहे.
संगनमत असल्याचा संशय
महानगरपालिकेचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक बजेट असते. असे असताना देखील महत्त्वाच्या बिटको रुग्णालयात औषधांचा पुरेसा पुरवठा केला जात नाही. हे आश्चर्य कारक म्हणावे लागेल. बिटको रुग्णालयातील काही डॉक्टर आणि खाजगी मेडिकल स्टोअर्सच्या संचालकांची मिलीभगत तर नाही ना असा संशय नितीन खर्जुल यांनी यानिमित्ताने व्यक्त केला आहे.