शनिवारी होणा-या गणेशमूर्ती विसर्जनासाठी पोलिस व महापालिका प्रशासनाने नाशिक रोड, जेलरोड, देवळालीगाव परिसरात जय्यत तयारी केली आहे. महापालिका प्रशासनातर्फे नदीचे प्रदूषण टाकण्यासाठी गणेशमूर्ती संकलन केंद्रावर मूर्ती दान करण्याचे आवाहन केले आहे.
नाशिक रोडला गणेश मूर्ती विसर्जनाची संपन्न पंरपरा आहे. मिरवणूकीत मंडळांचा मोठा सहभाग असतो. गणेश मूर्ती विसर्जनसाठी सर्वात जास्त गर्दी ही जेलरोड दसक आणि नांदूर या गोदावरी घाटांवर होते. सततधार पावसामुळे तेथे विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दोरखंडा लावण्यात आले आहेत. चेहेडी दारणा नदी, देवळालीगाव, विहीतगाव, वडनेर येथील वालदेवी नदी, चाडेगाव दारणा नदी घाट, टाकळी नंदिनी घाट येथे विसर्जन होणार आहे. नदी प्रदूषणा टाळण्यासाठी महापालिकेने नाशिक रोड भागात विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार केले आहेत. दत्त मंदिर मनपा शाळा क्र.१२५ चे मैदान, देवळालीगाव गाडेकर मळा मैदान, शिखरेवाडी मैदान, जयभवानी रोड निसर्गोपचार केंद्राशेजारील मैदान, जेलरोड नारायणबापू चौक, राजराजेश्वरी चौक, चेहेडी तानाजी मालुसरे क्रीडांगण, सामनगाव रोड शासकीय तंत्रनिकेतन येथे कृत्रित तलाव करण्यात आले असून विद्युत दिवे लावण्यात आले आहेत.
कृत्रिम तलाव व नद्यांच्या घाटांवर मूर्ती संकलन केंद्र व मंडप उभारण्यात आले आहेत. निमार्ल्यासाठी स्वतंत्र घंटागाडी, कर्मचारी, सुरक्षा रक्षक, अग्नीशमन दलाचे जवान, जलतरणपटू यांची व्यवस्था करण्यात आली आहे. नदीपात्रात दोरखंड लावण्यात आले आहे. पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे.
प्रत्येक सार्वजनिक मंडळाचे गणेश मूर्तीचे विसर्जन होईपर्यंत पोलिस व होमगार्ड नियुक्त करण्यात आले आहेत. मुख्य मिरवणूक मार्गावर नाशिक रोड देवळाली व्यापारी बॅंक वाजतगाजत मिरवणूक काढणार आहे. अनेक मंडळ आपल्या भागातून स्वतंत्र मिरवणूक काढणार आहेत.