विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघात काहीसा दूर गेलेला राष्ट्रीय काँग्रेस पक्ष मुख्य प्रवाहात येताना दिसतो. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजाराम पानगव्हाणे, युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष शरद आहेर, उत्तर महाराष्ट्र ओबीसी सेल काँग्रेस अध्यक्ष विजय राऊत आणि शहर युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष संदीप शर्मा यांनी नाशिक पूर्व मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारीची मागणी केली आहे. त्यांच्या मागणीमुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून तयारी करीत असलेल्या इच्छूक उमेदवारांना आव्हान निर्माण होऊ शकते.
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघांमधून राष्ट्रीय काँग्रेसकडे प्रबळ उमेदवार नाही, राष्ट्रीय काँग्रेसची मतदारसंघात पकड नाही, वर्चस्व नाही, त्यांच्याकडे पदाधिकारी नाही, कार्यकर्ते नाही, असे म्हणून मित्र पक्षाकडून काँग्रेसला कायम हिणवले जाते, येथील काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल खच्चीकरण करण्याचे काम आजावर मित्र पक्षासह विरोधी पक्ष करीत असल्याचा आरोप अन् चर्चा स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये होतांना दिसते. याउलट मित्र पक्ष असणारा शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यापेक्षा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची या मतदार संघात एक गठ्ठा वोट बँक आहे. हे विसरून चालणार नाही. काँग्रेसच्या विचारसरणीला मानणारा येथे एक मोठा वर्ग आहे. मुस्लिम, दलित समाज काँग्रेसच्या बाजूने असल्याचे लोकसभा निवडणुकीत स्पष्ट झाले.
काँग्रेसची बोळवण थांबवा
नाशिक जिल्ह्यात विधानसभेचे १५ मतदारसंघ आहे. २०१९ निवडणुकीत मालेगाव मध्य आणि इगतपुरी मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. या वेळेला नाशिक पूर्व. नाशिक मध्य. चांदवड. कळवण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला वातावरण अनुकूल दिसते. त्यामुळे काँग्रेसने या मतदारसंघांवर दावा केला आहे. यात नाशिक पूर्वचे नाव आघाडीवर दिसते.
२००९ निवडणुकीत पानगव्हाणे यांचा बंडखोरीमुळे पराभव !
२००९ मधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून राजाराम पानगव्हाणे यांनी निवडणूक लढवलेली आहे. देविदास पिंगळे अपक्ष, दिनकर आढाव अपक्ष, स्व. सुभाष घिया अपक्ष, गणेश उनवणे रिपाई ( आ ), जोहरे गजमल बसपा यांच्यासह अपक्ष उमेदवार रिंगणात होते. त्यांना मिळालेल्या मतांची गोळाबेरीज केली तर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा उमेदवार येथे विजयी होऊ शकतो.