945 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
महाविकास आघाडी मधील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ सोडला जाईल. असे जवळपास निश्चित मानले जाते आहे. मागील काही दिवसांपासून प्रेस कामगार नेते जगदीश गोडसे व सामाजिक कार्यकर्ते अतुल मते यांनी या मतदार संघात निवडणूकीची तयारी सुरू केली आहे. पण निवडणुकीचे बिगुल वाजताच दोघांच्या नावाऐवजी भलत्याच नावाची चर्चा राष्ट्रवादीत दबक्या आवाजात केली जात आहे. निष्ठावंत कार्यकर्ते मात्र या चर्चेने अस्वस्थ झालेले दिसतात. पक्षाने गोडसे किंवा मते यांच्यापैकी कोणताही एक उमेदवार दयावा, आम्ही प्रामाणिकपणे त्यांचे काम करू, पण पैशाने गब्बर असलेला भाजपचा आयात उमेदवार देऊ नये, अशी अपेक्षा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी मतदान होईल. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीचे बिगुल वाचताच नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये संभाव्य उमेदवारांच्या नावाची चर्चा पुढे येऊ लागली आहे. यामध्ये अपेक्षेप्रमाणे जगदीश गोडसे आणि अतुल मते यांचे नाव आहे. परंतु ऐनवेळी भाजपमधील पैशाने गब्बर असलेल्या एका बड्या नेत्याच्या नावाची पण चर्चा रंगत आहे. भाजपच्या या नेत्याच्या हातात बऱ्याच काळ महापालिकेच्या तिजोरीची चावी होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे या नेत्याने नाशिक पूर्व मधून उमेदवारीची मागणी केली असल्याचे बोलले जात आहे. या चर्चेला नाशिक मधील राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी दुजोरा देत आहे. भाजप नेत्याची रंगलेली चर्चा खरी असेल तर राष्ट्रवादीचे निष्ठावंत पदाधिकारी कार्यकर्ते काय भूमिका घेतात, याकडे लक्ष असणार आहे.
