650 Post Views
नाशिक रोड प्रतिनिधी
गुणवत्ता नसलेल्या वातावरणात राज्यातील शिक्षक ज्ञानदानाचे काम करीत आहे. विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता निर्माण व्हावी, यासाठी ते झटताना दिसतात. सध्या गुणवत्ता निर्माण होईल असे वातावरण राज्यात आहे का ?, असा सवाल माजी आमदार तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्यअध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी उपस्थित केला आहे.
नाशिक येथे रविवारी ( दि.६ ) रोजी परशुराम सायखेडकर नाट्यगृहांमध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना नाशिक विभाग आयोजित शिक्षण तपस्वी पुरस्काराचे वितरण झाले. त्यावेळेस माजी आमदार अभ्यंकर बोलत होते.याप्रसंगी शिक्षक सेनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष संजय चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, राज्याचे माजी शिक्षण संचालक भालचंद्र देसले, पेरेंट्स असोसिएशनचे निलेश साळुंखे, भारतीय कामगार सेनेचे नितीन विखार आदी मान्यवर व्यासपीठावर होते. अंभ्यांकर यांनी यावेळी जुनी पेन्शन योजना, नव्याने जाहीर करण्यात आलेली युजीसी पेन्शन योजना, डीसीपीएस आणि एनपीएस या पेन्शन योजनेतील तफावत याविषयी माहिती दिली. त्याचप्रमाणे शिक्षकांना भेडसावणाऱ्या समस्या, राज्यातील शैक्षणिक बजेट आणि त्यावरील खर्चातील तफावत याची वस्तुनिष्ठ सखोल माहिती दिली. विद्यमान सरकारच्या कार्यपद्धतीवर आणि शैक्षणिक धोरणा संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले.
