दिंडोरी : अशोक निकम
यावर्षी समाधानकारक पाऊस पडू दे, आणि बळीराजाला सुजलाम सुखलाम ठेव, असे साकडे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे यांनी बोहडा उत्सवानिमित्त मोहाडी ग्रामदैवताला घातले.दिंडोरी तालुक्यातील मोहाडीचे ग्रामदैवत मोहाडमल्ल महाराज व इतर देवदेवतांचा सार्वजनिक बोहाडा उत्सव शांततेत व उत्साहात साजरा झाला.
उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. गेल्या चार दिवसांपासून मोहाडी व पंचक्रोशीतील वातावरण या निमित्त भक्तीपूर्ण व उत्साहाचे होते. बोहाड्याची सुरुवात ग्रामदेवतेला नारळ वाढवून करण्यात आली. यावेळी मोहाडमल्ल देवस्थान व परिसरात विद्युत रोशनाई करण्यात आली.या कालावधीत मंदिरासमोर तेल जाळणे व देव दैत्यांची वेशभूषा करून सोंगे नाचवली. गावातील सर्व जाती-धर्माच्या लोकांना पूर्वीपासून वंशपरंपरेने सोंगे वाटून दिलेली आहे. सर्वांनी सक्रिय सहभाग घेतला. लोकांनी जातीभेद व राजकीय मतभेद विसरून समतेची व एकात्मतेची अनोखी भावना जोपासली. वाजंत्री व संबळ या पारंपारिक वाद्यांच्या तालावर सोंगाबरोबरच लहानथोरांनाही ताल धरायला लावला.
इतर महत्वाच्या बातम्या आणी वेबसाईटवर पोहचण्यासाठी http://nashikbatmidarnews.com वर क्लिक करा
बोहाड्याची सुरुवात शारदा गणपतीच्या आगमन व आरतीने तर सांगता नरसिंह अवताराने झाली. बोहाड्यात इंद्रजीत-लक्ष्मण,राम-रावण, देवी-महिषासुर, भीम-बकासुर यांच्यातील लढाई, डोक्यावर अग्नीचे भंदे घेऊन सुंदर वेश परिधान करून टिपऱ्यांच्या तालावर वेताळाच्या आजूबाजूला नाचणाऱ्या सात आसरा, डोक्यावर आपल्या उंची इतक्याच उंच प्रकाश दिव्यांनी चमकणारा फिरता भव्य टोप घातलेला वीरभद्र, घोड्यावर बसून चढाई करणारा मेघनाथ, लहान मुलांना खाणारी अकराळ विक्राळ रूपाची आसळी, हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी झपाटणारा नरसिंह, तसेच घटोत्कच वधा नंतर शोक करणारी त्याची आई हिडिंबा लोकांना विशेष भावली. याबरोबरच अधांतरी लटकलेला ध्रुव, गजासुर,नारद,झोटिंग, भैरव,महादेव पार्वती, दहातोंडे असणारा रावण,काट्या मारुती, वानर सेना व मासा ही लहान थोरांची दाद मिळवून गेला.
कार्यक्रमात लोकांमधील अंधश्रद्धा तसेच दुष्काळी परिस्थिती उद्भवण्याची कारणे व वृक्षारोपण अशा समाज उपयोगी बाबींवर उद्बोधन करण्यात आले. बोहाडा यशस्वीतेसाठी पंच कमिटी अध्यक्ष लक्ष्मण पाटील,दत्तात्रय मौले,शांताराम निकम, लक्ष्मण कळमकर, आबासाहेब जाधव, कैलास कळमकर, सुदर्शन जाधव, शंकर ठाकूर,सतीश काळे, शामराव जाधव, गुलाब घोलप,सुनील निकम,विजय देशमुख, बाबा निकम, मयूर जाधव आदींनी परिश्रम घेतले.
बोहाडा उत्सवप्रसंगी दिंडोरी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे यांनी भेट देऊन उत्सवाला शुभेच्छा दिल्या. ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी मविप्र संचालक प्रवीण जाधव, कादवा संचालक शहाजी सोमवंशी, बोहाडा उत्सव कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.