नाशिक, प्रतिनिधी : सध्या पृथ्वीवरील तापमान दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे विकासाच्या नावाखाली होणारी वृक्षतोड आहे. भविष्यात पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी तसेच तापमानावर नियंत्रण मिळवण्यासाठी वृक्षरोपण आणि वृक्ष संवर्धन अत्यंत आवश्यक आहे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी खंडेराव मेढे यांनी केले आहे.
देवळाली कॅम्प येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजूकाया महाविद्यालयात शुक्रवारी ( दि. १४ ) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आले होते. त्याप्रसंगी खंडेराव मेढे बोलत होते.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. एस. के. शिंदे, डॉ. बी. पी.पगार, एच. एस. व्ही. सी. विभागाचे प्रमुख शशिकांत अमृतकर, नितीन काळे, नवनाथ झोंबाळ आदी. उपस्थित होते. यावेळी बोलताना उपप्राचार्य डॉक्टर एस के शिंदे म्हणाले की, विकासाच्या नावाखाली आज सिमेंटची जंगले उभी केली जात आहे.परिणामी पर्यावरणाचा रास देखील होत आहे. वृक्षतोडीच्या तुलनेत वृक्षरोपण आणि संवर्धन होत नाही, त्याचा दुष्परिणाम म्हणून तापमान वाढत आहे, यावर नियंत्रण मिळविण्यासाठी एकमेव जालीम उपाय म्हणजे वृक्षरोपण आणि संवर्धन आहे. सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक करताना डॉ. डी. बी.पगार यांनी वृक्षरोपण आणि संवर्धनासाठी सर्वांनी पुढे येणे आवश्यक असल्याचे सांगीतले. आभार शशिकांत अमृतकर यांनी मानले. याप्रसंगी शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.