1,891 Post Views
नाशिकरोड ; प्रतिनिधी
विद्यमान सरपंच गोरख जाधव यांच्यावर मार्च महिन्यात अविश्वास ठराव मंजूर झाला होता. त्यानंतर शुक्रवारी ( दि.१४ )रोजी सरपंच निवडीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण १७ सदस्यांपैकी १३ सदस्यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. उर्वरित चार सदस्य गैरहजर राहिले. उपस्थित सर्व सदस्यांनी बाजीराव जाधव यांच्या बाजूने पाठिंबा दर्शविला. त्यामुळे बाजीराव जाधव हे सरपंच पदासाठी बिनविरोध निवडून आल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली. जाधव यांच्या नावाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी फटाके वाजवत,गुलाल उधळत जाधव यांच्या निवडीचे स्वागत केले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मागील काही दिवसांपासून शिंदे ग्रामपंचायत मध्ये विद्यमान सरपंच गोरख जाधव यांच्या विरोधात सत्ताधाऱ्यांमध्येच नाराजीचा सूर असल्याची चर्चा होती. त्यांना पदावून हटवण्यासाठी सत्ताधारी गटातच फूट पडली. सत्ताधारी गटाचे काही नाराज सदस्य आणि माजी जिल्हा परिषद सदस्य संजय तुंगार यांचे तीन सदस्य असे एकूण तेरा सदस्य एकत्र झाले.त्यांनी गोरख जाधव यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर केला. त्यानंतर सरपंच पदासाठी एकजुटीने बाजीराव जाधव यांचे नाव सुचविले. सत्ताधारी गटाच्या गटबाजीचा फायदा माजी जिल्हा परिषद सदस्य संजय तुंगार यांना झाला. त्यांनी आपला पाठिंबा बाजीराव जाधव यांना दिला. त्यामुळे बाजीराव जाधव यांच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडणे सोपे झाले.

दरम्यान विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गणपत जाधव,अशोक बोराडे,ज्ञानेश्वर जाधव, तानाजी जाधव,नितीन जाधव, वंदना जाधव,शालिनी तुंगार,अनिता तुंगार,अर्चना जाधव,संगीता बोराडे, रीना मते,अश्विनी साळवे हे तेरा सदस्य सरपंच पदाचे उमेदवार बाजीराव जाधव यांच्या बाजूने होते. तर मावळते सरपंच गोरख जाधव यांच्या बाजूने सुप्रिया तुंगार, हिराबाई जाधव, भाऊराव धुळे, गोरक्ष जाधव हे सदस्य होते. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय तुंगार, चंद्रकांत तुंगार प्रकाश मते आदीसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
