नाशिक शिक्षक मतदार संघातील इच्छुक उमेदवारांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू आहे. यावेळी उमेदवारांनी प्रतिज्ञापत्रामध्ये दिलेल्या माहिती विषयी मतदारांमध्ये उत्सुकता असते. प्रतिज्ञापत्रात आपल्यावर दाखल गुन्ह्यांची माहिती कुठला उमेदवार देतो, अन् कुठला उमेदवार लपवतो, याकडे मतदार लक्ष ठेऊन असतात. एका उमेदवाराने आपल्यावर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची माहिती प्रतिज्ञापत्रात दिलेली नाही.आपल्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती प्रतिज्ञापत्रापासून लपवणारा उमेदवार कोण ?, याविषयी नाशिक शिक्षक मतदार संघात चर्चा आहे.
नाशिक शिक्षक मतदार संघातील यंदाची निवडणूक प्रचंड वादग्रस्त होतांना दिसते. रोज काहीतरी नविन प्रकरण उजेडात येत आहे. आमदार किशोर दराडे यांच्या नावाचे साधर्म्य असलेल्या किशोर प्रभाकर दराडे यांनी उमदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या समोरच धक्काुक्की, मारहाण झाली. आमदार किशोर दराडे समर्थकांनी मारहाण केल्याची चर्चा यावेळी केली जात होती. यानंतर आमदार दराडे यांच्या समर्थकांनी तर चक्क नाशिकरोड पोलिस ठाणे वेठीस धरले. किशोर प्रभाकर दराडे यास आमच्या ताब्यात देण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांवर दबावतंत्राचा वापर केला. तब्बल पाच तास रात्री उशिरा पर्यंत पोलीस ठाणे वेठीस धरले. दरम्यान शिक्षक मतदार संघात दाखल केलेल्या इच्छुक उमेदवारांच्या उमेदवारी अर्जांची तसेच इतर कागदपत्रांची छाननी सद्या केली जात आहे. त्यामध्ये एका उमेदवाराने आपल्या नावावर वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यांची माहिती प्रतिज्ञापत्रातून लपविल्याचे उजेडात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जाते आहे. निवडणुक प्रचारादरम्यान आपल्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती उजेडात येऊ नये, त्याचा निवडणुकीवर परिणाम होऊ नये, असा हेतू समोर ठेवत संबधित उमेदवाराने प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची माहिती दडविल्याची चर्चा आहे.
दाखल गुन्ह्याचे स्वरूप असे
फसवणूक व ठकवणूक करणे, खोटे दस्तऐवज उपलब्ध करून आर्थिक फसवणूक करणे, कागदपत्रात खोट्या नोंदणी करणे, बनावट कागदपत्र तयार करणे, नोकरीवर काम करीत नसतांना हजेरी व पगार पत्रकात नाव टाकून पगार काढणे, फौजदारी फसणुकीचा गुन्हा दाखल असताना तसेच याप्रकरणी तारीख दिलेली असताना देखील प्रतिज्ञापत्रात त्याचा उल्लेख, खुलासा केलेला नाही. आपल्या विरोधात विविध कलमानुसार न्यायालयात तारीख सुरू असताना याविषयी देखील माहिती प्रतिज्ञापत्रात दिलेली नाही.