नाशिक : त्रंबकेश्वर येथील यादव नामदेव बोरसे या शेतकऱ्याचा पाऊस आला म्हणून शेतातील जनावरे आणण्यासाठी गेले असताना, अचानक आलेल्या मोसमी पावसाने व विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला.
विजेचा धक्का इतका जोरात होता की, मोहाचे झाड चिरले गेले. यादव बोरसे हे त्यांच्या कुटुंबातील कमावते मुख्य पुरुष होते. त्यांच्या अकाली निधनाने त्याच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. यादव बोरसे नेहमीप्रमाणे संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास आपली जनावरे शेतातून घरी आणण्यास गेले असताना, अचानक विजेचा जोरदार कडकडाट होऊन त्यांना मोठा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदर विजेचा झटका इतका जोरात होता की, संपूर्ण परिसरात मोठ्या कडाक्याचा आवाज आला. यादव बोरसे हे शेतातून घरी परतले नाही म्हणून त्यांच्या घरचे बघण्यासाठी तिकडे गेले असता, यादव बोरसे हे मोहाच्या झाडाखाली मृत्युमुखी पडलेले त्यांना दिसले. ते बघताच त्यांच्या घरच्यांनी यादव बोरसे यांना तिथून उचलून बघितले असता, ते मृत्यू झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. यादव बोरसे यांचे पश्चात त्यांची पत्नी, मुलं, व नातवंड असा परिवार आहे. सदर घटनेची माहिती मिळताच हरसूल पोलीस स्टेशनचे पी एस आय मोरे व पोलीस कर्मचारी यांनी जागेवर भेट देऊन पंचनामा केला, व शव विछेदनासाठी हरसूल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे, तर त्यांना शासनाने भरपाई द्यावी व त्यांच्या कुटुंबाला आधार द्यावा अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.