नाशिक : नाशिक लोकसभा मतदार संघाची निवडणूक नुकतीच पार पडली. निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे प्रचंड मतांनी निवडून आले. तर सलग दोन वेळा नाशिकचे खासदार पद भूषवलेले महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे पराभूत झाले. मतमोजणीला अवघे तीन ते चार दिवस झाले. जय – पराजयाची चर्चा मतदार संघात अद्याप सुरूच आहे. असे असताना वाजे अन् गोडसे यांनी चक्क गळाभेट घेतली. ते पाहून प्रसिद्धी माध्यमानी क्षणाचाही वेळ न दवडता दोघांनाही कॅमेऱ्यात कैद केल्याने चर्चेला सुरुवात झाली.
नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीदरम्यान अर्ज भरण्याच्या निमित्ताने दोन्ही शिवसेनेचे पदाधिकारी विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाले. यावेळी नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे आणि माजी खासदार हेमंत गोडसे हे आमनेसामने आले. यावेळी आजी माजी खासदारांनी गळा भेट घेतली. पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत वाजे आणि गोडसे यांची भेट झाली. निवडणूक संपल्याने दोघांची सदिच्छा भेट झाली. दोघांनी गळाभेट घेत एकमेकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. दुसरीकडे शिवसेनेचे दोन्ही गट आमनेसामने आले. विभागीय आयुक्त कार्यालयातच शिवसेनेच्या दोन्ही गटात घोषणा युद्ध रंगल्याचे दिसून आले. ठाकरे गटाचे संदीप गुळवे उमेदवारी अर्ज दाखल करून कार्यालयातून बाहेर जाताना आणि किशोर दराडे अर्ज भरण्यासाठी आले असताना दोन्ही कार्यकर्ते समोरासमोर आल्यामुळे घोषणाबाजी देण्यात आली. एकीकडे आजी माजी खासदार गळा भेट घेत असतानाच दुसरीकडे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये सामना रंगला. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.