नाशिक : शिक्षक मतदार संघातील इच्छूक उमेदवार किशोर प्रभाकर दराडे यांना झालेली धक्काबुक्की अन् मारहाण याबाबत माझा काही एक संबंध नाही, मी आलो व माझा उमेदवारी अर्ज भरला, आणि बाहेर निघून आलो. त्यांना धक्काबुक्की कोणी व का केली, याविषयी मला काही माहीती नाही, विरोधकांचे कटकारस्थान राहू शकते, असा खुलासा आमदार किशोर दराडे यांनी प्रसिद्धी माध्यमांसोबत बोलताना केला.
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आमदार किशोर दराडे यांनी आपला उमेदवारी अर्ज शुक्रवारी ( दि.७ ) दाखल केला आहे. समर्थकांसह रॅली काढून निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण गेडाम यांच्याकडे त्यांनी अर्ज सुपूर्द केला. यावेळी पालकमंत्री दादा भुसे, आमदार देवयानी फरांदे, विजय करंजकर, राजू लवटे आदी मान्यवर उपस्थित होते. नाशिक शिक्षक मतदार संघाचे विद्यमान आमदार किशोर दराडे आहे.

या वेळेला त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवारी नाकारलेली आहे. त्यांच्या ऐवजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. गोपाळराव गुळवे यांचे चिरंजीव एड. संदीप गुळवे यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे आमदार किशोर दराडे यांनी शिवसेना शिंदे गटाकडून म्हणजे महायुतीकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. या वेळेला नाशिक शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडी तसेच महायुतीमध्ये मुख्य लढत होईल, असे बोलले जाते आहे. आमदार किशोर दराडे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी त्यांच्या समर्थकांनी रॅली काढली होती. रॅलीमध्ये मोठ्या संख्येने शिक्षक वृंद उपस्थित होते.