नाशिक : विरोधी पक्षाच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे.त्यांना त्यांचा पराभव दिसतो आहे.त्यामुळे त्यांनी माझ्याच नावाचे दोन उमेदवार निवडणूक रिंगणात उभे केले आहे. यापूर्वी देखील असे प्रकार घडलेले आपण पाहिले आहेत. शिक्षक मतदार संघात सर्वच शिक्षक हे सुज्ञ,सदैव जागरूक आणि तत्पर असतात. त्यामुळे त्यांना खरे एड .संदीप गोपाळराव गुळवे कोण हे चांगल्या प्रकारे माहीत आहे. पहिल्या पसंतीचे मत देऊन शिक्षक वृंद मला निवडून देतील. त्यामुळे शिक्षक विरोधकांच्या कटकारस्थान अन् षडयंत्राला बळी पडणार नाही असा विश्वास एड.संदीप गुळवे यांनी बोलून दाखविला.
नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत एड. संदीप गुळवे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे शुक्रवारी ( दि.७ ) उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एड.गुळवे यांना नाशिक शिक्षक मतदार संघात अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याकडे गुळवे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी एड. संदीप गुळवे यांच्या प्रचारासाठी नाशिक रोड परिसरातील सिन्नर फाटा येथील एका खाजगी मंगल कार्यालयात जाहीर सभा घेण्यात आली होती. सभेनंतर एड.गुळवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांसोबत बोलताना गुळवे यांनी संवाद साधला. आपल्याला संधी मिळाली तर आपण जुनी पेन्शन योजना, नवीन शैक्षणिक धोरण, अर्ध वेतनावरील भरती ,शिक्षक टप्पा वेतन पद्धती आणि शिक्षक भरती आदी. अनेक विषयावर आवाज उठवू असे आश्वासन दिले.याप्रसंगी नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे, मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस एड. नितीन ठाकरे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, विलास शिंदे आदी मान्यवर तसेच शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.