सामाजिक, राजकीय व सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल; नाशिकमध्ये २१ ऑक्टोबरला होणार सन्मान
नाशिकरोड : उमेश देशमुख
पाथरी येथील परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि युवकांचे प्रेरणास्थान असलेले श्री. दत्तराव मांयदळे यांना मराठवाडा सामाजिक फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘मराठवाडा भूषण २०२६’ पुरस्कार जाहीर झाला आहे. सामाजिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रातील त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

२१ ऑक्टोबरला नाशिकमध्ये पुरस्कार वितरण
बुधवार, दिनांक २१ ऑक्टोबर २०२६ रोजी नाशिक येथील श्री सिद्धी बँक्वेट हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘महाकुंभ दसरा मेळाव्या’त दत्तराव मांयदळे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मराठवाडा सामाजिक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. आबासाहेब टरपले आणि प्रदेशाध्यक्ष डी. एस. कातारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
दत्तराव मांयदळे यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने पाथरीसह संपूर्ण परभणी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत मिळालेल्या या सन्मानाबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवर, सहकारी आणि नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.