Home Blog महावितरणच्या विद्युत भवनात आगीचा भडका; अग्निशामक सिलिंडर निकामी असल्याचा आरोप, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या...

महावितरणच्या विद्युत भवनात आगीचा भडका; अग्निशामक सिलिंडर निकामी असल्याचा आरोप, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह! Vodio बघा

0
14 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

नाशिक व अहिल्यानगर या दोन जिल्ह्यांचा कारभार पाहणाऱ्या महावितरणच्या विद्युत भवन या मुख्य इमारतीला शनिवारी सकाळी सुमारे दहा ते साडेदहा वाजेच्या दरम्यान आग लागल्याची घटना घडली. मुख्य अभियंत्यांच्या दालनाला लागून असलेल्या मीटिंग हॉलमध्ये आग लागल्याने कार्यालयातील कर्मचाऱ्यांची आग विझविताना अक्षरशः दमछाक झाली. विशेष म्हणजे, आग विझविण्यासाठी उपलब्ध असलेल्या अग्निशामक सिलिंडरपैकी बहुतांश सिलिंडर कुचकामी ठरल्याचा गंभीर आरोप होत असून, या घटनेमुळे महावितरणच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अग्निशामक सिलिंडर असूनही उपयोग नाही!

आगीची घटना घडल्यानंतर ती विझविण्यासाठी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. मात्र, उपलब्ध अग्निशामक सिलिंडर प्रभावी ठरले नसल्याने कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. वेळेवर आणि योग्य प्रकारे कार्यरत असलेली अग्निशामक यंत्रणा उपलब्ध असती, तर आगीचे स्वरूप सुरुवातीलाच नियंत्रणात आणता आले असते आणि संभाव्य नुकसानही टाळता आले असते, अशी चर्चा होत आहे.

योगायोगाने शनिवारी कार्यालयाला सुट्टी असल्याने कार्यालयात नेहमीप्रमाणे गर्दी नव्हती. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त होत आहे. मात्र, कार्यालय सुरू असताना अशी घटना घडली असती, तर परिस्थिती किती गंभीर झाली असती, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ग्राहकांना धडे, मग स्वतःच्या सुरक्षेचे काय?

वीज ग्राहकांना सुरक्षिततेचे आणि आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देणाऱ्या महावितरणच्या स्वतःच्या मुख्य कार्यालयातील अग्निसुरक्षा व्यवस्थेची ही अवस्था असेल, तर सर्वसामान्य ग्राहकांनी कोणाकडून अपेक्षा ठेवायची? अग्निशामक सिलिंडरची नियमित तपासणी होते का? ती कालबाह्य किंवा नादुरुस्त असल्यास त्याची जबाबदारी कोणाची? अशा प्रश्नांना या घटनेमुळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

जबाबदार अधिकारी घटनास्थळी का फिरकले नाहीत?

या घटनेनंतर चोवीस तास उलटूनही मुख्य अभियंता सुंदर लटपटे आणि अन्य जबाबदार अधिकारी घटनास्थळी आले नसल्याचा आरोप केला जात आहे. या अनुपस्थितीमागील कारण स्पष्ट होणे आवश्यक असून, आगीच्या घटनेची चौकशी करून अग्निशामक यंत्रणा कार्यरत होती की नाही, याची तपासणी करण्याची मागणी होत आहे.

इतरांना शिस्तीचे आणि जबाबदारीचे धडे देणाऱ्या यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारीच संकटाच्या प्रसंगी जबाबदारीपासून दूर राहणार असतील, तर त्यांच्याकडून आदर्श काय घ्यायचा? या घटनेची दखल घेऊन वरिष्ठ पातळीवरून जाब विचारला जाणार का? दोषींवर कारवाई होणार का? असे सवाल अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये चर्चिले जात आहेत.

आगीच्या घटनेची निष्पक्ष चौकशी, अग्निशामक यंत्रणेची तातडीने तपासणी आणि जबाबदारी निश्चित करून आवश्यक ती कारवाई करण्याची गरज या निमित्ताने अधोरेखित झाली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version