Home Blog शेतकऱ्यांचा रस्ता रोखला; आता थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव! भुजबळ नॉलेज सिटी प्रशासनाच्या भूमिकेविरोधात...

शेतकऱ्यांचा रस्ता रोखला; आता थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव! भुजबळ नॉलेज सिटी प्रशासनाच्या भूमिकेविरोधात आडगावचे शेतकरी संतप्त

0
237 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

भुजबळ नॉलेज सिटीच्या लगत असणाऱ्या शेतकऱ्यांचा जुन्या वहिवाटेचा एकमेव रस्ता संरक्षण भिंतीच्या नावाखाली रोखला आहे. त्यामुळे व्यथित झालेल्या स्थानिक शेतकरी वर्गाला मोठा अडसर निर्माण झालेला दिसतो. मोठ मोठे दगड रस्त्यात टाकल्याने शेतकऱ्यांचा खोळंबा झाला आहे. स्थानिक भुजबळ नॉलेजच्या व्यवस्थापनाने टोकाची भूमिका टाळून त्रस्त शेतकरी वर्गासोबत चर्चा करून सर्व समावेशक मार्ग काढावा, यासाठी शेतकरी तयार आहे. मात्र आपली अडेलतट्टू भूमिका कायम ठेवल्यास मुख्यमंत्री सचिवालयात दाद मागून वेळप्रसंगी तीव्र आंदोलन छेडू अश्या मनस्थितीत शेतकरी वर्ग असल्याचे दिसून येत आहे.

सध्या दिमाखात उभ्या असलेल्या भुजबळ नॉलेज सिटीची जागा स्थानिक गावकऱ्यांनी शैक्षणिक कारणासाठी भुजबळ नॉलेजला दिली. त्यात कोणताही प्रकारे खोडा किंवा अडसर निर्माण केला नाही. भुजबळ नॉलेज सिटीच्या स्थापनेपासून स्थानिक शेतकरी वर्ग आणि भुजबळ नॉलेज सिटीच्या प्रशासनात किरकोळ अपवाद वगळता सलोख्याचे संबंध राहिले आहे. परंतु अलीकडच्या काळात सद्यस्थितीत असलेल्या व्यवस्थापनाने येथील शेतकरी वर्गाचा रस्ता बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येते. काही वर्षांपूर्वी हाच रस्ता बंद करण्याच्या तयारीत येथील प्रशासन होते.

परंतु त्या वेळेला स्थानिक शेतकरी आणि राष्ट्रवादीचे दिलीप खैरे यांच्यामध्ये चर्चा झाली. खैरे यांनी मध्यस्थी केल्याने रस्त्याच्या वादावर पडदा पडला. रस्ता तसाच खुला ठेवण्यात आला. परंतु पुन्हा एकदा रस्त्याच्या जुन्याच वादाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. येथील शेतकऱ्यांना भुजबळ नॉलेजच्या प्रशासनासोबत कोणत्याही प्रकारचा वाद नको आहे. आमचा जुन्या वहिवाटेचा अडसर दूर केला तर आम्ही देखील आंदोलन स्थगित करू, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

खैरे यांनी मध्यस्थी करावी

काही वर्षांपूर्वी रस्त्याच्या  वादाच्या प्रसंगी मंत्री छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय दिलीप खैरे यांनी सर्वसमवेशक योग्य मध्यस्थी केली. त्यामुळे वाद क्षमला. यावेळेला देखील त्यांनी मध्यस्थी करून कायमचा वाद मिटवावा.आम्हाला देखील वाद नको. शेवटी भुजबळ नॉलेज सिटी आमच्यासाठी देखील अभिमानाची बाब आहे.पण हीच अभिमानाची बाब आमच्या सर्वात जुन्या वहिवाटेच्या रस्त्याच्या मुळावर उठत असेल तर आम्हाला आंदोनाशिवाय दुसरा मार्ग नाही.अशी शेतकरी वर्गात चर्चा आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version