नाशिकरोड : उमेश देशमुख
मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्या फुटपाथ फर्स्ट अभियानातंर्गत नाशिक रोड येथे आंबेडकर रोड, देवी चौक, शिवाजी पुतळा भागातील फुटपाथवरील तसेच वाहतुकीला अडथळा ठरणारी अनाधिकृत दुकानाबाहेरील अतिक्रमणे हटवून सामान जप्त केले. दरम्यान, महापालिकेने हिंमत दाखवून मुक्तीधाम, सोमानी उद्यान, गायकवाड मळा, जामा मस्जिद रोड, बिटको चौक येथील दुकानाबाहेर मोठ्या प्रमाणात होणारी अतिक्रमणे काढावी अशी मागणी त्रस्त केली जात आहे.

अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखणे, नाशिक रोडच्या विभागीय अधिकारी डॉ. प्रज्ञा त्रिभुवन व अतिक्रमण विभाग प्रमुख विवेक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराज पुतळ्यापासून आंबेडकर रोडवरील फुटपाथ, देवी चौक व शिवाजी पुतळा मार्गावरील फुटपाथ व वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमण हटविण्यात आली. पाच टपऱ्या, दोन स्टील काऊंटर, लोखंडी तीन टेबल, एक लोखंडी काऊंटर, तीन स्टॅन्ड बोर्ड, दुकानाबाहेर फुटपाथवर अडथळा ठरणारे बॅनर पथकाने जप्त केले.
शिवाजी पुतळा, आंबेडकर पुतळा, देवी चौकात येणाऱ्या दोन्ही बाजूच्या रस्त्यावरील दुकानाबाहेरील अतिक्रमण कारवाई सुरू झाल्यामुळे व्यवसायिकांनी साहित्य घेतल्याने रस्ता मोकळा झाला होता. अतिक्रमण विभागाचे कर्मचारी सुमेश दिवे, प्रकाश नाठे, सिद्धांत गरुड, संतोष पवार, प्रमोद आवाळे य़ांच्यासह अतिक्रमण मुख्यालय, सातपूर अतिक्रमण विरोधी पथक, पोलीस पथक, एनडीएस कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी यांनी या मोहिमेमध्ये सहभाग घेतला होता.