नाशिकरोड परिसरातील गोसावीवाडी येथील पाच मुलांचा मंगळवारी ( दि.२१ ) सायंकाळी इगतपुरी तालुक्यातील भावली धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. यापैकी चार मुले अल्पवयीन आहे.सायंकाळी उशिरा या घटनेची माहिती नाशिकरोड परिसरात समजली. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
अनस खान दिलदार खान, वय १७ वर्ष, नाझिया इमरान खान, ( वय १५ वर्ष), मीजबाह दिलदार खान,( वय १६ वर्ष), हनीफ अहमद शेख, ( वय २४ वर्ष), ईकरा दिलदार खान,( वय १४ वर्ष ) अशी मयत झालेल्या मुलांची नावे आहेत. हे सर्व जण मामा सोबत रिक्षाने भावली धरणाच्या परिसरात फिरण्यासाठी गेले असल्याचे सांगितले जात आहे. भावली धरण परिसरात हे सर्वजण पाण्यात उतरले. यावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडू लागले. आरडा ओरडा झाल्याने आदिवासी तरुणांनी तातडीने धरणाकडे धाव घेतली. पाण्यात उड्या मारून त्यांनी बुडत असलेल्या मुलांना वाचविण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
सायंकाळी उशिरापर्यंत पाण्यात बुडालेल्या मुलांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते. घटनेची माहिती मिळताच इगतपुरी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अधिक तपास केला असता सर्वजण नाशिक रोड परिसरातील गोसावी वाडी येथील असल्याचे समजले. या घटनेची माहिती नाशिकरोड परिसरातील मृत्यू पावलेल्या मुलांच्या नातेवाईकांना कळविण्यात आली. त्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत या संदर्भातील चौकशी सुरु होती.