नाशिकरोड : उमेश देशमुख
नाशिक महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुक पार पडून अनेक दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. तरी अद्याप स्वीकृत नगरसेवकांची निवड प्रकिया रेंगाळलेली आहे. सत्ताधारी भाजपकडून तब्बल तीनशे इच्छुक आहे. शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आदी सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांचे या निवडीकडे लक्ष लागून आहे. नाशिकरोड परिसरातून शिवसेना शिंदे गटाचे विनायक ( बाबुराव ) आढाव, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांचे सुपुत्र हेमंत ( कुमार ) गायकवाड, भाजप नाशिकरोड मंडळाचे अध्यक्ष शांताराम घंटे आणि राम कदम यांची नावे चर्चेत आहे. नाशिकरोड मधून यापैकी कुणाची वर्णी लागणार हे उत्सुकतेचे ठरणार आहे.
महापालिका निवडणुकीनंतर महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष आदी महत्त्वाच्या निवडणुका पार पडल्या की लगोलग महापालिका अंतर्गत विविध समित्या आणि स्वीकृत नगरसेवक निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्याची परंपरा मानली जाते.पण यावेळेला नाशिकला महापौर उपमहापौर स्थायी समिती अध्यक्ष मिळाले पण अद्याप स्वीकृत सदस्य निवडणूक झालेली नाही. ती का रेंगाळलेली यास सर्वस्वी भाजप जबाबदार असल्याचे सर्वश्रुत झाले आहे. त्यांच्याकडे सुमारे तीनशे इच्छुक असल्याचे बोलले जाते. त्यामुळे कुणाची निवड करावी, कुणाला टाळावे असा मोठा गुंतागुंतीचा प्रश्न भाजप पदाधिकाऱ्यांना पडला असावा. त्यामुळे निवड प्रकिया रखडलेली असल्याचा आरोप विरोधक भाजपावर करीत आहे. भाजपपुढे जी समस्या आहे ती सर्वच पक्षापुढे असणार यात शंका नाही.पण आज ना उद्या कधीतरी सत्ताधारी भाजपला पुढे यावे लागेल आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. अन्यथा सामान्य कार्यकर्ते आणि भाजपचे पदाधिकारी यांच्यामध्ये वादंग उठण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाऊ पण पुढे येईनात !..
नाशिक महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपने उमेदवारीचे ए.बी.फॉर्म वाटप केले. त्यांनंतर भाऊंना किती पळापळ करावी लागली हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे यावेळेला म्हणजे स्वीकृत निवडीनंतर पुन्हा पळापळ तर करावी लागणार नाही ना,या भीतीमुळे कदाचित भाऊ या भानगडी पासून चार हात दूर असावेत अशी चर्चा भाजप वर्तुळात रंगलेली दिसते. स्वीकृत पासून भाऊच दूर राहत असेल तर इतर स्थानिक पदाधिकारी पुढे सरसावण्याची शक्यता शून्यच वाटते. परिणामी स्वीकृत सदस्य निवड प्रक्रिया भाऊंच्या नव्हे तर राम भरोसे होईल.असे म्हटले तर आश्चर्य वाटायला नको.
आढाव यांना न्याय मिळणार ?
राज्यात शिवसेना शिंदे गट या नव्या राजकीय पक्षाची स्थापना झाली.स्थापनेनंतर नाशिकरोड परिसरातून
ज्येष्ठ नेते बाबुराव आढाव लगोलग शिंदे गटात सामील झाले.नाशिकपूर्व विधानसभा मतदार संघाचे प्रमुख म्हणून पक्षाने त्यांच्यावर जबाबदारी सोपवली. विधासभा, लोकसभा आणि महापालिका निवडणुकीत त्यांनी पक्षासाठी प्रामाणिकपणे कामे केली. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांचा पुढाकार आहे. यापूर्वी ते शिक्षण मंडळ सदस्य होते. नाशिकरोड प्रमाणे संपूर्ण शहर आणि जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात त्यांचा मोठा मित्रपरिवार आणि संपर्क आहे. नाशिकपूर्व मतदार संघात आणि विशेष करून नाशिकरोड व जेलरोड परिसरात शिवसेना शिंदे गटाची पाळेमुळे रुजविण्यात बाबुराव आढाव यांचे योगदान महत्वाचे मानले जाते. पक्षश्रेष्ठी त्यांची पक्षातील सेवाज्येष्ठता आणि योगदान विचारत घेत बाबुराव आढाव यांना स्वीकृत नगरसेवक पदावर निवड करून योग्य तो सन्मान मिळवून देतील.असा आत्मविश्वास बाबुराव आढाव आणि त्यांच्या समर्थकांना आहे.
निष्ठेचे फळ मिळेल !
नाशिक जिल्ह्यात एकामागून एक अनेक शिवसेना नेत्यांनी उध्दव ठाकरे यांची सात सोडली. आपल्या सोयीच्या पक्षात प्रवेश घेऊन राजकीय लाभाची पदे मिळवली. यास नाशिकरोड परिसरातील ज्येष्ठ नेते शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड अपवाद ठरले. त्यांना देखील शिवसेनेला जय महाराष्ट्र करून इतर पक्षात जाऊन लाभाची पदे सहज मिळवता येणे शक्य होते.पण त्यांनी तसे केले नाही. शिवसेनेत थांबून त्यांनी आपली निष्ठा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत दाखविली. एवढेच नाही तर मागील महापालिका आणि यावेळच्या नगरपालिका निवडणुकीत त्यांनी नाशिकरोड विभागात त्यांनी उबाठाचे नगरसेवक निवडणून आणून दाखविले. माजी मंत्री बबन घोलप, सुधाकर बडगुजर यासारख्या अनेक दिग्गजांनी पक्ष सोडला. पण दत्ता गायकवाड यांनी नाशिकरोड हा उबाठाचा बालेकिल्ला शाबुत ठेवला. त्याची पडझड होऊ दिली नाही.
भाजपच्या लाटेत नाशिकरोड परिसरातील २३ जागांपैकी उबाठाला १० जागा मिळवून देत पक्षाची होणारी वाताहत रोखली. भाजपला ९ तर शिवसेना शिंदे गटाला ४ जागांवर समाधान मानावे लागले. घोलप, बडगुजर यांच्या प्रमाणे त्यांनी पक्ष सोडून इतर पक्षात प्रवेश केला असता तर आज उबाठाचा नाशिकरोड बालिकेला पूर्णपणे ढासळला गेला असता. त्यामुळे त्यांच्या कामाची पोहच पावली म्हणून स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांचे पुत्र हेमंत ( कुमार ) गायकवाड यांची उबाठाने करावी.असा एक सूर नाशिकरोड परिसरातून उमटताना दिसतो.
घंटेंचे काय होईल !
भाजप निष्ठावंतांना न्याय देणारा पक्ष असल्याचे बोलले जात होते. इतरांपेक्षा वेगळा पक्ष अशी भाजपची प्रतिमा होती. पण २०१४ नंतर सत्तेच्या धुळवडी पासून भाजपचे निष्ठावंत सतत मागे पडत गेले. २०२६ महापालिका निवडणुक पूर्व उमेदवारी वाटपात निष्ठावंताची केविलवाणी अवस्था झाली. उमेदवारी नाकारणाऱ्या निष्ठावंतांना स्वीकृत नगरसेवक पदाचे आश्वासन दिले. प्रत्यक्ष आश्वासन पूर्तीची वेळ आल्यावर खरोखर पदाधिकारी आश्वासन पूर्तता करणार की नाही याविषयी इच्छुकाना संशय वाटतो. नाशिकरोड मंडळाचे अध्यक्ष शांताराम घंटे यांचे नाव आघाडीवर आहे. नाशिकरोड परिसरात मागील काही वर्षापासून घंटे भाजपचे सक्रीय पदाधिकारी आहे. पक्षाने त्यांना डावलून हेमंत गायकवाड यांना नाशिकरोड मंडळाचे अध्यक्ष केले होते. त्यावेळी घंटे यांनी संयम ठेवला. परिणामी पक्षाने त्यांना नाशिकरोड मंडळ अध्यक्ष केले.नाशिकरोड भागातून घंटे यांचे नाव स्वीकृत असून त्यांना पक्ष संधी देणार की नाही हे पाहावे लागेल. मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत बाजीराव भागवत नाशिकरोड मंडळाचे अध्यक्ष होते. महापालिकेत भाजपने घवघवीत यश मिळवले. त्यांनंतर बाजीराव भागवत यांना नाशिकरोड मधून स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्त केले होते. तोच निकष शांताराम घंटे यांना लावावा अशी चर्चा स्थानिक भाजपा मध्ये केली जाते आहे. भाजपकडून राम कदम यांचे देखील नाव स्वीकृत नगरसेवक पदासाठी पुढे येत आहे.पदाधिकारी त्यांच्या नावाची कितपत दखल घेतात यावर सर्वकाही अवलंबून असणार आहे.