नाशिकरोड : उमेश देशमुख
भगूर शहरातील नमो उद्यान प्रकल्पाच्या आणि विविध विकास कामात जाणीवपूर्वक अडथळा आणण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही,शहराच्या विकासाशी संबंधित असलेल्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पाबाबत चुकीची माहिती पसरवून प्रशासनाची दिशाभूल करण्याचे प्रकार अत्यंत गंभीर आहे. त्याकडे दुर्लक्ष केले जाणार नाही, अती झाले तर आपण संबंधितावर कायदेशीर कारवाई करू असा स्पष्ट इशारा भगूरच्या नगराध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिला.

भगूर येथे नमो उद्यानाचे काम नियोजनबद्ध तसेच वेगाने सुरू आहे. प्रकल्प नागरिकांसाठी विरंगुळा, पर्यावरण संवर्धन आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणारा ठरणार आहे. या विकासकामाला अडथळा निर्माण करण्याच्या उद्देशाने शिवसेनेच्या वतिने शहर प्रमुख विक्रम सोनवणे आणि शिवसेना गटनेते शंकर करंजकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच मंत्रालय स्तरावर चुकीची व दिशाभूल करणारी माहिती देत पत्रव्यवहार केल्याची गंभीर बाब उजेडात आल्याचे नगराध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी म्हटले.
पत्रव्यवहारात नमो उद्यानासाठी निश्चित करण्यात आलेली जागा ही एसटीपी (सांडपाणी प्रक्रिया केंद्र) साठी आरक्षित असल्याचा दावा करण्यात आला आहे. नगराध्यक्षा बलकवडे यांनी हा दावा स्पष्टपणे फेटाळून लावला आहे. तसेच पूर्णपणे चुकीची आधारहीन माहिती पसरवत विरोधक वरिष्ठ अधिकारी वर्ग,प्रशासन आणि नागरिकांची दिशाभूल करीत आहे.खोट्या माहितीच्या आधारे केवळ नमो उद्यानाचे काम थांबवण्याचाच नव्हे, तर मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या एसटीपी प्रकल्पालाही अडथळा निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो आहे.असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
सावरकर उद्यानाच्या प्रकल्पाचे काय
यापूर्वीही शिवसेनेच्या सत्तेत स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकर उद्यानाचा प्रकल्प तब्बल २५ वर्षे प्रलंबित ठेवण्यात आल्याचा संदर्भ देत, शहराच्या प्रगतीला अडथळा आणण्याची शिवसेनेची जुनी मानसिकता पुन्हा दिसून येत असल्याची टीका करण्यात त्यांच्यावर केली जात असल्याचे नगराध्यक्षा बलकवडे यांनी म्हटले आहे.
विकासकामात राजकारण नको
विकासकामांबाबत राजकारण करून नागरिकांच्या हिताशी खेळ करणे अत्यंत निषेधार्ह आहे.भगूर शहराचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. नमो उद्यानासारखे प्रकल्प नागरिकांच्या हितासाठीच राबवले जात आहेत. त्यामुळे अशा कामांमध्ये अडथळा आणणाऱ्या व्यक्ती किंवा गटांविरोधात योग्य त्या कायदेशीर कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान भगूर व परिसर विकासाच्या आड येणारी कोणतीही कृती खपवून घेतली जाणार नाही. नागरिकांनीही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे आणि विकासकामांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन नगराध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.