नाशिकरोड : उमेश देशमुख
जिल्ह्यातील सामाजिक राजकीय आणि वारकरी संप्रदायामध्ये नावलौकिक मिळविलेले माजी नगरसेवक त्र्यंबक दादा गायकवाड आणि पं. शंकरराव वैरागकर यांना २०२६ मधील ऋतुरंग सन्मान पुरस्कार जाहीर झाला. शुक्रवारी ( दि. १ मे ) सायंकाळी साडेसहा वाजता महाराष्ट्र तसेच कामगार दिनानिमित्ताने पुरस्कार वितरण सोहळा येथील ऋतुरंग भवन येथे पार पडणार आहे.या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावेअसे आवाहन ऋतुरंगतर्फे करण्यात आले आहे.
नाशिकरोड येथील प्रमुख सांस्कृतिक केंद्र असणारे ऋतुरंग फाउंडेशन आपली २६ वर्षांची सांस्कृतिक क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबवण्याची परंपरा कायम राखून आहे. एखाद्या शहराचा, भागाचा विकास होतो तेव्हा तेथील सांस्कृतिक, शैक्षणिक, नगरविकास आदी क्षेत्रांमध्ये निस्वार्थपणे अहोरात्र झटलेल्या हातांचे मोलाचे योगदान असते. अश्याच उल्लेखनीय व्यक्तींचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यासाठी ऋतुरंग फाउंडेशन आयोजित “ऋतुरंग सन्मान पुरस्कार” यावर्षीपासून सुरू करण्यात येत आहे.
महाराष्ट्र दिनानिमित्त शुक्रवार दिनांक १ मे २०२६ सायंकाळी साडेसहा वाजता ऋतुरंग भवन, दत्त मंदिर येथे समाजसेवा, बँकींग, शिक्षण, धर्म, नगरविकास अश्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे श्री त्रिंबकराव गायकवाड* यांना तसेच ज्येष्ठ संगीत उपासक पं. शंकरराव वैरागकर* यांना संगीतक्षेत्र, कला व सांस्कृतिक विभागासाठी ऋतुरंग सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
कार्यक्रमात, ऋतुरंग भवनात नियमित आयोजित होणाऱ्या विविध सराव वर्ग व शिक्षण वर्गातून विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. यामुळे या वर्गांमध्ये शिकणाऱ्या मुलांना प्रोत्साहन मिळेल व वर्ग संचालकांचा उत्साह वाढवून कला जोपासना करण्यास बळ मिळेल असा ऋतुरंग फाउंडेशनचा विश्वास आहे.

कार्यक्रमांसाठी नाशिक रोड भागात रसिक प्रेक्षकांनी आवर्जून उपस्थित रहावे व ज्येष्ठांच्या सन्मानात तसेच बालकांना प्रोत्साहन देण्यात आवर्जून सहभागी व्हावे असे आवाहन ऋतुरंग फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे.