Home Blog सकाळ समूहाचे जेष्ठ पत्रकार संपत देवगिरे यांना पीएचडी पदवी प्रदान ; “नाशिकच्या...

सकाळ समूहाचे जेष्ठ पत्रकार संपत देवगिरे यांना पीएचडी पदवी प्रदान ; “नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यातील संज्ञापनप्रक्रिया आणि साधने” या विषयावर केले संशोधन

0
297 Post Views

नाशिक रोड : उमेश देशमुख

सकाळचे ज्येष्ठ पत्रकार संपत देवगिरे यांना “नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यातील संज्ञापनप्रक्रिया आणि साधने” या विषयावर केलेल्या संशोधनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएचडी पदवी प्रदान केली आहे. नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा संज्ञापनाच्या दृष्टीने केलेला हा पहिलाच सखोल संशोधन अभ्यास मानला जात आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन आणि व्यवस्थापन करताना पारंपारिक व ऐतिहासिक संदर्भांना विशेष महत्त्व असते. स्थळ, मुहूर्त, धार्मिक उपक्रम यामध्ये अनेक वर्षांची परंपरा जपली जाते. मात्र अलीकडच्या काळात आधुनिक माध्यमे, संज्ञापनाची विविध साधने आणि माहिती तंत्रज्ञान यामुळे कुंभमेळ्याच्या व्यवस्थापनात आणि प्रसारमाध्यमांमध्ये लक्षणीय बदल झाले आहेत. या बदलांचा अभ्यास २०१४ ते २०२० या कालावधीत करण्यात आला.

हा संशोधन प्रबंध पुणे विद्यापीठाच्या न्यायमूर्ती रानडे वृत्तपत्रविद्या आणि संज्ञापन संस्थेच्या विभाग प्रमुख डॉ. उज्वला बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाला. संस्थेचे सध्याचे विभाग प्रमुख डॉ. संजय तांबट यांनी सहमार्गदर्शक (को-गाईड) म्हणून मार्गदर्शन केले.

जगातील सर्वाधिक गर्दीचा मेळा

जागतिक स्तरावर दखल घेतला जाणारा सिंहस्थ कुंभमेळा हा जगातील सर्वाधिक गर्दी होणाऱ्या दहा मेळ्यांपैकी पहिल्या क्रमांकाचा धार्मिक उत्सव मानला जातो. या पार्श्वभूमीवर संशोधनामध्ये स्थानिक दैनिकांच्या वृत्तांकनाचाही पथदर्शी अभ्यास करण्यात आला. विविध दैनिकांमध्ये प्रकाशित झालेल्या ३०१४ बातम्यांचे विषय, स्वरूप आणि उपक्रमनिहाय विश्लेषण करण्यात आले. या संशोधनातील महत्त्वपूर्ण निष्कर्षांवर आधारित शोध निबंध मुंबईतील के.सी. महाविद्यालयात आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर करण्यात आला होता.

प्रशासनास होणार लाभ !

संपत देवगिरे हे दैनिक सकाळ समूहाचे जेष्ठ पत्रकार आहेत त्यांना नाशिकचा गाढा अभ्यास आहे.त्यांनी नाशिकचा कुंभमेळा हा जवळून पाहिलेला आहे. नाशिक मध्ये २०२७ मध्ये कुंभमेळा पार पडणार आहे.कुंभमेळ्याच्या एक वर्ष अगोदरच पत्रकार संपत देवगिरी यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने “नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यातील संज्ञापनप्रक्रिया आणि साधने” या विषयावर केलेल्या सखोल संशोधनाबद्दल पीएचडी पदवी दिली. त्यांच्या अभ्यासाचा फायदा कुंभमेळा नियोजन समितीला निश्चितपणे होऊ शकतो.

इगतपुरीच्या भूमिपुत्राचा सन्मान !

  • संपत पूजा देवगिरे यांचे मूळ गाव इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव घाडगा आहे. त्यांचा जन्म गरीब शेतकरी कुटुंबामध्ये झाला. कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संपत देवगिरे यांनी शालेय, महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांचे कुटुंब देवळाली गाव परिसरात स्थायिक झाले. येथेच देवगिरे यांनी दैनिक सकाळ मधून परिसर वार्ताहर म्हणून काम करण्यास सुरूवात केली. अभ्यासू, जिज्ञासा आणि चिकित्सक वृत्तीचा त्यांना या क्षेत्रात लाभ मिळाला. अल्पावधीतच त्यांनी नावलौकिक मिळविला. दैनिक सकाळमध्ये अंधारातले नाशिक हे त्यांचे सदर गाजले होते. यात नाशिक शहरात रात्रीच्यावेळी चालणाऱ्या बऱ्यावाईट घटनांवर त्यांनी प्रकाशझोत टाकला. नाशिक शहराचा जुना आणि नवीन इतिहास त्यांच्याकडून ऐकण्याजोगा आहे. पत्रकारितेत एक अभ्यासू आणि सडीतोड व्यक्तिमत्व म्हणून परिचित ते परिचित आहे. त्यांचा मोठा गोतवळा आहे. त्यांनी प्राप्त केलेल्या पीएचडी पदवी मुळे त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाचा हा एकप्रकारे गौरव मानला जातो आहे. यानिमित्ताने त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version