पासपोर्ट, चलनी नोटा, मुद्रांक आदींच्या दर्जेदार कामाबद्दल देश-विदेशात प्रसिध्द असलेल्या नाशिक रोड येथील आयएसपी-सीएनपी प्रेस कामगारांतर्फे माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना अनोखी भेटवस्तू देण्यात आली. लोकशाहीच्या उत्सवानिमित्त १२५ रुपयांचे चांदीचे नाणे त्यांना आज नाशिक येथे भेट देण्यात आले. संविधान तयार करून जनतेला मतदानाचा अधिकार देणारे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त मुंबईतील टांकसाळेत हे नाणे तयार करण्यात आले असून त्यावर बाबासाहेबांची प्रतिमा आहे.
लोकसभा निवडणुक प्रचारासाठी नाशिक दौ-यावर आलेल्या शरद पवारांची प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर, कार्तिक डांगे, प्रवीण बनसोडे, संतोष कटाळे, चंद्रकांत हिंगमिरे, अण्णासाहेब सोनवणे, राजीव जगताप, अशोक पेखळे, बबन सैद, संदीप व्यवहारे, सचिन दिवटे, संतोष कुलथे यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन हे नाणे सुपूर्द केले. गेल्या ५६ वर्षापासून आपण राजकीय क्षेत्रात कार्यरत आहात. लोकशाही मार्गाने संविधानाचे संरक्षण व संवर्धन करावे, यासाठी हे नाणे आपणास भेट देण्यात आहे. त्याचा स्वीकार करावा, अशी विनंती शिष्टमंडळाने केली. शरद पवारांनी इंडिया सेक्युरिटी प्रेस करन्सी नोट प्रेस मजदूर संघाच्या उपक्रमाचे कौतुक केले.
जगदीश गोडसे यांनी सांगितले की, प्रेस कामगार प्रतिनिधींनी शरद पवारांना या आधीही अनोख्या भेटवस्तू दिल्या आहेत. शरद पवार गेल्या वेळी नाशिक दौ-यावर आले असता त्यांच्या जन्म तारखांचे क्रमांक असलेल्या नोटा भेट देण्यात आल्या होत्या. तसेच त्यांच्या विवाहाच्या तारखेच्या, ते कृषीमंत्री झाले तेव्हाच्या आणि मुख्यमंत्री झाले तेव्हाच्या तारखांच्या नोटा त्यांना त्या त्या प्रसंगी भेट देण्यात आल्या होत्या. शरद पवार मुंबई क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष झाले त्या तारखेच्या नोटा भेट देण्यात आल्या होत्या. ८ एप्रिल २०२३ रोजी हिंद मजूदर संभेच्या स्थापनेला ७५ वर्ष पूर्ण झाले. त्याबद्दल नाशिक रोड प्रेसच्या जिमखान्यावर शरद पवारांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम झाला होता. प्रेस कामगारांचे व नाशिककरांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन शरद पवारांनी शिष्टमंडळाला दिले.