नाशिकरोड : उमेश देशमुख
नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याने मनपा नाशिक करिता नियुक्त केलेले मुख्य निवडणूक निरीक्षक श्री. सचेंद्र प्रताप सिंग यांनी शुक्रवारी ( दि. २ ) राजीव गांधी भवन येथे नाशिक महानगरपालिकेच्या निवडणूक तयारीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीमती मनिषा खत्री यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी झालेल्या आढावा बैठकीत नाशिक शहराची लोकसंख्या, मनपा निवडणूक आरक्षण, भौगोलिकदृष्ट्या रहिवासी व विरळ वस्ती असलेले भाग, तसेच गुगल मॅपच्या आधारे मतदान केंद्रांचे नियोजन याबाबत सविस्तर माहिती मुख्य निवडणूक निरीक्षकांनी घेतली.नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण १५६३ मतदान केंद्रे असून, मागील विधानसभा व लोकसभा निवडणुकांतील मतदान केंद्रांची तुलनात्मक माहितीही यावेळी सादर करण्यात आली.प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी ९०० मतदार मतदान करतील या दृष्टीने गर्दी टाळता येईल व लांब रांगा लागणार नाहीत, याची दक्षता मनपाने घ्यावी, असे निर्देश मुख्य निवडणूक निरीक्षकांनी दिले. मतदारांना आपले मतदान केंद्र सहज शोधता यावे यासाठी स्पष्ट फलक, तसेच QR कोडद्वारे मतदान केंद्राचे लोकेशन उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यासोबतच शाळेतील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पत्रलेखन उपक्रम राबवून मतदार जनजागृती वाढविण्याचे निर्देशही देण्यात आले.या वेळी ईव्हीएम मशिन पोहोचविण्यासाठीची वाहतूक व्यवस्था, निवडणूक प्रक्रिया पार पाडणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, तसेच निवडणूक व्यवस्थापनाबाबतची तयारी यांची माहिती घेण्यात आली.नाशिक महानगरपालिकेचे मुख्यालय राजीव गांधी भवन हे निवडणूक मुख्य कार्यालय आहे.
निवडणूक तथा प्रशासन उपायुक्त
साताळकर यांनी दिली माहिती
मनपाच्या सहा विभागांतील दहा निवडणूक कार्यालयांचे कामकाज सुरळीत सुरू असल्याची माहिती निवडणूक तथा प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी दिली.
आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांचे झेंडे, बॅनर काढून घेण्यात आले असल्याची माहिती आचारसंहिता कक्षामार्फत देण्यात आली. तसेच पेड न्यूज नियंत्रण समितीच्या कामकाजाचा आढावाही यावेळी घेण्यात आला. उमेदवार व राजकीय पक्षांसाठी एक खिडकी योजनेद्वारे विविध परवानग्या जलदगतीने देण्यात येत असल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले. मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने मागील निवडणुकांत ज्या मतदान केंद्रांवर मतदान कमी झाले होते, त्या ठिकाणी विशेष जनजागृती उपक्रम राबविण्याच्या सूचना मुख्य निवडणूक निरीक्षक श्री. सचेंद्र प्रताप सिंग यांनी दिल्या. तसेच नोडल अधिकाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडाव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.
बैठकीला उपस्थित अधिकारी वर्ग
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त श्री. प्रदीप चौधरी, श्रीमती स्मिता झगडे,विविध विभागाचे निवडणूक नोडल अधिकारी, उपजिल्हाधिकारी श्री. शरद घोरपडे, पोलीस उपायुक्त श्री. किरण चव्हाण, उपायुक्त श्री. अजित निकत, श्री. नितीन पवार, शहर अभियंता श्री. संजय अग्रवाल, मुख्य लेखाधिकारी श्री. दत्तात्रेय पाथरूट, मुख्य लेखापरीक्षक श्री. बळवंत गायकवाड, अधीक्षक शहर अभियंता श्री. अविनाश धनाईत, वस्तू व सेवा कर विभागाचे उपायुक्त डॉ. अंजुम तडवी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक श्री. संतोष झगडे, उपअधीक्षक श्री. अमृत ठोंबरे, सहाय्यक संचालक नगररचना श्री. कल्पेश पाटील, सहाय्य प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. विलास चौधरी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. जितेंद्र धनेश्वर, शिक्षण अधिकारी डॉ. मिता चौधरी, कार्यकारी अभियंता श्री. बाजीराव माळी संदेश शिंदे,जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांच्यासह विविध विभागांचे नोडल अधिकारी उपस्थित होते.
शहरातील निवडणूक कार्यालयांना भेटी
बैठकीनंतर मुख्य निवडणूक निरीक्षक श्री. सचेंद्र प्रताप सिंग, तसेच नाशिक मनपा सार्वत्रिक निवडणूक निरीक्षक व अप्पर जिल्हाधिकारी श्री. बाळासाहेब कोळेकर यांनी शहरातील विविध निवडणूक कार्यालयांना भेटी देऊन कामकाजाची पाहणी केली. यामध्ये नवीन नाशिक व सातपूर निवडणूक कार्यालय, आयटीआय येथील मतदान केंद्र, दिव्यांग भवन येथील निवडणूक कार्यालय, डी.जे.पी. नगर येथील ईव्हीएम मशिन स्ट्रॉंग रूम, तसेच पेठे विद्यालयातील मतदान केंद्र आदी ठिकाणांचा समावेश होता. या ठिकाणी सुरक्षाव्यवस्था व मतदारांसाठी उपलब्ध करण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती त्यांनी जाणून घेतली.
पूर्व तयारी विषयी समाधान
दिवसभर नाशिक शहरातील निवडणूक प्रक्रियेचे सूक्ष्म निरीक्षण केल्यानंतर नाशिक महानगरपालिकेच्या निवडणूक तयारी बाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक निरीक्षक श्री. सचेंद्र प्रताप सिंग यांनी समाधान व्यक्त केले. आणि निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततापूर्ण व यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना निर्देश दिले.