Home Blog विद्यार्थ्यांच्या अंगी राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वाची जडणघडण घडवा ! ; डॉ. प्रतापराव दिघावकर

विद्यार्थ्यांच्या अंगी राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वाची जडणघडण घडवा ! ; डॉ. प्रतापराव दिघावकर

0
95 Post Views

 

नाशिकरोड : उमेश देशमुख

देवळा एज्युकेशन सोसायटी, देवळा यांच्या वतीने कर्मवीर रामरावजी आहेर यांच्या ३२ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित स्मृतिदिन समारंभ गुरुवार, दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन व स्वागतगीताने झाली. देवळा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. हितेंद्र रामरावजी आहेर यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. कर्मवीर रामरावजी आहेर यांनी ग्रामीण भागात शिक्षणाचा दीप प्रज्वलित करून अनेक पिढ्यांचे आयुष्य घडवले, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
प्रमुख अतिथी मा. डॉ. प्रतापराव दिघावकर (IPS – निवृत्त), माजी पोलीस महासंचालक यांचा परिचय व सन्मानपत्र वाचन संस्थेच्या सचिव प्रो. डॉ. मालती आहेर यांनी केले.


कार्यक्रमात अहवाल वाचन जिजामाता कन्या विद्यालय, देवळा यांच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस. डी. पगार यांनी केले. त्यानंतर शाळा व महाविद्यालय स्तरावरील विविध शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या शिक्षक व प्राध्यापकांचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. गौरवार्थी मान्यवरांचा परिचय व सन्मानपत्र वाचन उपप्राचार्य प्रो. डॉ. जयवंत भदाणे यांनी केले. शिक्षण व उद्योजकता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे मा. श्री. रवींद्र दशपुते तसेच उद्योजक मा. श्री. संजय हिरे यांचा यावेळी सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आला.यावेळी मा. श्री. रवींद्र दशपुते यांनी आपल्या मनोगतात शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन असून, आहेर कुटुंबीयांनी समाजासाठी उभे केलेले शैक्षणिक कार्य आदर्शवत असल्याचे नमूद केले.

उद्योजक मा. श्री. संजय हिरे यांनीही मनोगत व्यक्त करताना शिक्षणासोबत उद्योजकतेची जोड दिल्यास युवक स्वावलंबी होतील, असे मत मांडले व संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व वक्ते मा. डॉ. प्रतापराव दिघावकर (IPS – निवृत्त), माजी पोलीस महासंचालक यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोस व सशक्त व्यक्तिमत्त्व घडवणे अत्यावश्यक असून, यासाठी त्यांनी यशस्वी होण्याची चतुसूत्री मांडली. मोठी स्वप्ने पाहणे, अपयशाची भीती मनातून काढून टाकणे, दृढ आत्मविश्वास आणि चिकाटी या गुणांचा अंगीकार करण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

स्वतःच्या जीवनानुभवांचा संदर्भ देत त्यांनी शेतकऱ्यांबद्दल असलेली कृतज्ञता व्यक्त केली. समाजाच्या जडणघडणीत शेतकऱ्यांचे योगदान अनमोल असून त्यांच्या अथक परिश्रमावरच देश उभा आहे, असे त्यांनी नमूद केले. तसेच विद्यार्थ्यांबद्दल असलेली आपुलकी व कळवळा व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतःने केलेल्या विविध प्रयत्नांचा उल्लेख केला.

विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने पुढे जात समाजहिताचे भान ठेवून कार्य करावे, असे आवाहन करत त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या अंगी राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वाची जडणघडण घडवणे ही आजच्या काळाची गरज आहे. मूल्याधिष्ठित शिक्षण, शिस्त, प्रामाणिकपणा व सामाजिक जबाबदारी या मूल्यांचा विद्यार्थ्यांनी अंगीकार करावा, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. कर्मवीर रामरावजी आहेर यांचे विचार आजच्या पिढीसाठी दिशादर्शक असून त्यांचे कार्य चिरंतन प्रेरणा देणारे असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष श्रीमती सुशीलाताई (अक्कासाहेब) आहेर, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी उपप्राचार्य बापू रौंदळ मविप्र समाजाचे संचालक श्री. विजय पगार, डॉ.विश्राम निकम, गुरव सर, जितू अण्णा आहेर, प्रमोद दादा पाटील, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. एकनाथ पगार बीडिओ पाटील साहेब, प्रबंधक श्री दिनेश वाघमारे यांची विशेष उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन मुख्याध्यापक श्री. एस. ए. पगार यांनी केले, तर कार्यक्रमाची सांगता सौ. लीना अहिरराव यांच्या पसायदानाने झाली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version