Home Blog नाशिकरोड परिसरात गुरुवारी तिसरा बिबट्या जेरबंद

नाशिकरोड परिसरात गुरुवारी तिसरा बिबट्या जेरबंद

0
87 Post Views

नाशिकरोड : प्रतिनिधी

वडनेर-पिंपळगाव खांब, जयभवानी रोड, देवळालीगाव रोकडोबावाडी आदी परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे. वनविभाग त्यांना जेरबंद करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे. त्याला पुन्हा यश आले. महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राजवळ लावलेल्या पिंज-यात हा तिसरा बिबट्या गुरुवारी सकाळी अडकला. वन विभागाने दोन ते तीन किलोमीटर परिघात तब्बल १५ पिंजरे लावले होते, त्यापैकी एका पिंजऱ्यात हा बिबट्या अडकला.

नुकत्याच झालेल्या रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला वडनेर दुमाला येथे साडेतीन वर्षांच्या आयुष भगत याला दारातून उचलून नेत बिबट्याने त्याचा बळी घेतला होता. या हृदयद्रावक घटनेने नाशिक शहर व जिल्हा हादरला होता. संतप्त ग्रामस्थांनी व सर्व पक्षाच्या नेत्यांनी नाशिकच्या वन विभाग कार्यालयावर मोर्चा काढत तातडीने बिबटे पकडण्याची मागणी केली होती.

वन विभागाने या भागात बिबट्यांच्या शोधासाठी अत्याधुनिक साधनांचा वापर करून १५ पिंजरे लावले होते. आठ दिवसांपूर्वी याच परिसरात दोन बिबटे पकडण्यात आले होते. महालक्ष्मी नगर मळा व भवानी नगर मळा परिसरात हे दोन्ही बिबटे जेरबंद झाले होते. तथापी, अजूनही परिसरात बिबटे फिरत असल्याची भीती ग्रामस्थ तसेच माजी नगरसेवक जगदीश पवार यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, मंगळवारी सकाळी बिबट्या पिंजऱ्यात अडकलेला निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधला. पकडलेल्या बिबट्याला सुरक्षितरीत्या म्हसरूळ येथे हलविण्यात आले. या भागात अजून किती बिबटे आहेत आणि हल्लेखोर बिबट्या हाच का, याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version