Home Blog महावितरण कर्मचाऱ्यांच्या विविध अनुभवांना नाट्यकृतींमध्ये स्थान मिळावे ; महावितरणचे संचालक राजेंद्र पवार...

महावितरण कर्मचाऱ्यांच्या विविध अनुभवांना नाट्यकृतींमध्ये स्थान मिळावे ; महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांचे प्रतिपादन

0
169 Post Views

नाशिक रोड : प्रतिनिधी

महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी दररोज सव्वा तीन कोटी वीज ग्राहकांना सेवा देतात. विदर्भापासून कोकणापर्यंत पसरलेल्या या सेवा क्षेत्रात त्यांना अनेक चांगले-वाईट, नाट्यपूर्ण अनुभव येतात. हे अनुभव समाजासमोर आणण्यासाठी त्यांना कसदार लेखणीद्वारे नाट्यकृतींमध्ये स्थान मिळायला पाहिजे, अशी अपेक्षा महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी व्यक्त केली.
नाशिक येथील महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित महावितरणच्या राज्यस्तरीय आंतर प्रादेशिक विभागाच्या नाट्य स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. नाट्य स्पर्धेचे उद्घाटन महावितरणचे संचालक मानव संसाधन राजेंद्र पवार यांच्या हस्ते झाले.


महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामात अनेकदा विविध अनुभव येतात. हे सर्व अनुभव केवळ कर्मचाऱ्यांपर्यंत मर्यादित न राहता, ते समाजासमोर मांडले जावेत. यामुळे नागरिकांना महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या कामाची आणि त्यांचे कष्ट आणि समर्पण याची जाणीव होईल. हे नाट्यमय अनुभव जर नाटकांमध्ये किंवा इतर कलाकृतींमध्ये मांडले गेले, तर ते प्रेक्षकांना आकर्षित करतील आणि त्याचबरोबर त्यांना एक वेगळा दृष्टीकोन देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.नाशिक येथील महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरप्रादेशिक विभागाच्या नाट्य स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते उद्घाटक म्हणून बोलत होते.पुणे प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, प्रशिक्षण व सुरक्षा केंद्राचे मुख्य महाव्यवस्थापक अरविंद भादीकर, नाट्य स्पर्धेचे मुख्य समन्वयक मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके, नाट्य स्पर्धेचे निमंत्रक नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे मंचावर उपस्थित होते.
या उद्घाटन प्रसंगी राजेंद्र पवार यांनी नाट्य इतिहासाची माहिती देत नाट्य चळवळीमध्ये नाशिक मधील योगदान सुद्धा त्यांनी विषद केले. महावितरण च्या नाट्य कलावंतांच्या कलेचे कौतुक करण्याचे आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी मंचावरील मान्यवरांनी सुद्धा समायोचित मनोगत व्यक्त केले.
महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी चित्रफितीद्वारे या नाट्य स्पर्धेला शुभेच्छा दिल्या तसेच २४ तास वीज सेवेमध्ये व्यस्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ताणतणाव कमी होण्यास या नाट्य स्पर्धेच्या निमित्ताने मदत मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. महावितरणच्या या नाट्य कलावंतांनी उत्कृष्ट अभिनयाद्वारे रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करावे आणि स्पर्धेमध्ये विजय आणि पराजय होत असतो त्यामुळे निराश न होता पुन्हा पुढच्या वर्षी स्पर्धेसाठी जोमाने प्रयत्न करावे असे आवाहन श्री. लोकेश चंद्र यांनी केले.उद्घाटन सोहळ्याच्या सुरुवातीला नटराज मूर्तीचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
नाट्य स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके यांनी तर सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांनी केले. आभार प्रदर्शन उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले यांनी केले.त्यानंतर लगेचच, पहिल्या सत्रात कोकण प्रादेशिक विभागाचे अनिरुद्ध रांजेकर लिखित “आवर्त” तर दुसऱ्या सत्रात पुणे प्रादेशिक विभागाचे अजित दळवी लिखित “डॉक्टर तुम्ही सुद्धा” महावितरणच्या नाट्य कलाकारांनी सादर केले. या या नाटकातील कलावंत यांचा दमदार अभिनय, उत्कृष्ट संवाद, सुरेख नेपथ्य रचना आणि सुरेल पार्श्वसंगीतामुळे रसिकांची दाद मिळवली.नाट्य उद्घाटन सोहळा आणि दोन्ही नाट्यप्रयोगाला महावितरणचे नाशिक परिमंडळासह राज्यभरातील अभियंते, अधिकारी कर्मचारी यांचेसह नाट्य रसिक बहुसंख्येने उपस्थित होते.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version