Home Blog दरोडेखोरांच्या गोळीनेच केला दरोडेखोरांच्या टोळीचा घात! ; बिटकोत उपचारासाठी दाखल होताच झाले...

दरोडेखोरांच्या गोळीनेच केला दरोडेखोरांच्या टोळीचा घात! ; बिटकोत उपचारासाठी दाखल होताच झाले गजाआड

0
715 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

असे म्हणतात की वेळेपुढे कुणाचेही काही चालत नाही, वेळेत खूप मोठी ताकत असते, कुणावर कधी काही वेळ ओढवेन याचा काही नेम नाही. अगदी अश्या प्रकारच्या वाक्यांना शोभणारा प्रसंग शनिवारी ( दि.२६ ) नाशिकरोड परिसरात घडला. दरोड्याचा तयारीत असणाऱ्या दरोडेखोरांवर गस्तीच्या पोलिसांची नजर पडली. पोलिसांनी पाठलाग केला, पण त्यांची दिशाभूल करून दरोडेखोर पसार होण्यास यशस्वी ठरले. परंतु नियतीला काही वेगळेच मान्य होते. पसार झालेल्या दरोडेखोरांना पुन्हा पोलिसांच्या ताब्यात जावे लागले.याप्रसंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली २६ एप्रिल रोजी रात्री सहाय्यक पोलिस निरीक्षक शांताराम महाजन, हवालदार विनोद लखन, पंकज कर्पे, सौरभ लोंढे, संदेश रगतवान गस्तीवर होते. यादरम्यान देवळाली गावातील कुस्तीच्या मैदानाच्या भिंती शेजारी अंधारात सराईत गुन्हेगार सार्थक आहिरे, आबा पवार, हार्दिक बेलदार, पवन घोलप, समीर सोनवणे व त्यांचे तीन साथीदार दरोड्याच्या तयारीत दबा धरून बसलेले दिसले. पोलिसांची चाहूल लागताच ते दुचाकीवरून पळू लागले. हार्दिक बेलदार जवळ धारधार कोयता, सार्थक आहिरे याच्याकडे गावठी पिस्तुल, पवन घोलप याच्याकडे दोरी असल्याचे पोलिसांना बॅटरीच्या प्रकाशात दिसले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता देवळालीगाव, आण्णा भाऊ साठे नगरच्या गल्लीबोळातून दरोडेखोर पसार झाले.

अन् केला गोळीने घात

एकीकडे पसार दरोडेखोरांचा पोलिस शोध घेत होते. दुसरीकडे पहाटे चारच्या सुमारास एक जखमी व्यक्ती बिटको रुग्णालयात दाखल झाल्याचे रुग्णालयाकडून समजले. सार्थक आहिरे नावाच्या या व्यक्तीच्या मांडीला गोळी लागली असल्याने डॉक्टरांनी त्याला जिल्हा रुग्णालयात रवाना केले. त्याच्या सोबत आलेले पवन घोलप व समीर सोनवणे यांचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असताना त्यांनी सांगितले की, पोलिसांना पाहून देवळाली गावातून विहित लगावला मोटरसायकलवर पळून जाताना सार्थक गावठी पिस्तुल पॅन्टच्या खिशातून बाहेर काढत होता. त्यावेळी गोळी उडून त्याच्या मांडीत घुसून तो जखमी झाला. तसेच संशयितांकडून हार्दिक बेलदार व आबा पवार या साथीदारांची नावे समजली. पोलिसांनी त्यांच्यासह पाच जणांना अटक केली. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी दिली आहे.

वाहने, हत्यारांसह दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

हवालदार पकंज कर्पे यांच्या तक्रारीवरून सार्थक आहिरे, ऋषिकेश उर्फ आबा चंद्रकात पवार (२३, देवळालीगाव), हार्दिक हिरालाल बेलदार (२६,देवळालीगाव), पवन सुनिल घोलप (१९, देवळालीगाव), समीर संजय सोनवणे (२०, विहीतगाव) आणि इतर तीघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. आबा पवार, हार्दिक बेलदार, पवन घोलप, समीर सोनवणे या चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सार्थकने वापरलेली २५ हजाराची गावठी पिस्तुल तसेच कोयता, दोरी, १ लाख १० हजाराची पल्सर मोटरसायकल, ७० हजाराची सुझुकी कंपनीची अक्सेस मोपेड असा २ लाख ५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांना बक्षीस देण्याची शिफारस

पोलिस निरीक्षक संजीव फुलपगारे, सहाय्यक निरीक्षक शांताराम महाजन, उप निरीक्षक प्रभाकर सोनवणे, हवालदार विनोद लखन, इम्रान शेख, पंकज कर्पे, बरेलीकर, सूरज गवळी, सदेंश रगतवान, जयंत शिंदे, गौरव गवळी, अनिल शिंदे, सुनील गायकवाड, सौरभ लोंढे, नाशिक रोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सूर्ववंशी, नाना पानसरे, समाधान वाजे आदींनी ही कामगिरी केली. त्यांना बक्षिस देण्याची शिफारस वरिष्ठांकडे केल्याचे उपायुक्त मोनिका राऊत यांनी सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version