पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव बसवंत येथे बुधवारी ( दि.१५ )जाहीर सभा पार पडली. सभेप्रसंगी एका शेतकऱ्याने शेतीमालाला योग्य भाव मिळावा, यासाठी घोषणाबाजी केली. पोलिसांनी संबंधित शेतकऱ्याला वेळीच बाजूला घेऊन जात त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. बहुतांश प्रसिद्धी माध्यमांमध्ये याविषयी उल्लेख केलेला नाही.तसेच व्हिडिओ अथवा फोटो प्रसिद्ध केलेला दिसत नाही. मात्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे. पंतप्रधान मोदी यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे, दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार भारती पवार तसेच धुळे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ सुभाष भामरे यांच्या प्रचारासाठी पिंपळगाव येथे जाहीर सभा घेतली. त्यावेळी हा प्रकार घडला.