राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच नाशिक जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला जिल्ह्यात मिळालेल्या यशाबद्दल पदाधिकारी आणि शिवसैनिकांचे ते आभार व्यक्त करणार आहे. त्यामुळे शिवसैनिक दौऱ्याच्या तयारीला लागणार असून लवकरच तारीख निश्चित केली जाणार आहे. वाढदिवसानिमित्ताने शहरातील पदाधिकाऱ्यांसह उप महानगरप्रमुख शिवा तकाटे यांनी रविवारी ( दि.९ ) मुंबई येथे जाऊन शिंदे यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी विजय करंजकर, राजू अण्णा लवटे,बंटी तिदमे, भागवत बाबा अरोटे, विक्रम अण्णा नागरे, अभय महादास यांच्यासह शिवा तकाटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला मोठे यश मिळाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळाल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री शिंदे यांना नाशिक दौऱ्यावर येण्याची विनंती पदाधिकाऱ्यांनी केली. विनंतीला मान देऊन आपण लवकरच नाशिक जिल्ह्यातील शिवसैनिकांसाठी आभार दौऱ्याचे नियोजन करणार असे असल्याचे उपस्थित पदाधिकाऱ्यांना सांगितले.
महापालिका निवडणुकीवर निर्णय !
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाशिक दौऱ्याचे लवकरच नियोजन केले जाईल.त्यासाठी येथील पदाधिकारी देखील प्रयत्नशील आहे.सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात अपेक्षित निर्णय लागल्यास नाशिक महापालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा होऊ शकते. निवडणूक स्वतंत्र लढवायची की महायुतीमध्ये लढवायची यावर विचार विनिमय केला जाणार आहे.बहुतांश पदाधिकाऱ्यांचे निवडणूक स्वतंत्रपणे लढविण्यावर एकमत असल्याची चर्चा आहे.मात्र याविषयी अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री शिंदे हेच घेणार आहेत.