तरुणांनी चांगल्या माणसांची संगत धरावी. त्यामुळे माणूस जीवनात यशस्वी होतो. तसेच विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहावे, उच्च ध्येय डोळ्यासमोर ठेवून शैक्षणिक वाटचाल करावी,असे प्रतिपादन देवळाली कॅम्प पोलीस स्थानकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी केले.
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या श्रीमती विमलाबेन खिमजी तेजूकाया कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय देवळाली कॅम्प येथे गुरुवारी ( दि. ३० ) वार्षिक विद्यार्थी गुणगौरव पारितोषिक वितरण निमित्त आयोजित केलेल्या विविध गुणदर्शन स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी केले.प्राचार्या डॉ प्रतिमा वाघ यांनी विद्यार्थ्यांना कलेचा निखळ आनंद लुटण्याचे आवाहन केले. तसेच युवा सप्ताह दरम्यान विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलाविष्कारांचे कौतुक केले.व्यासपीठावर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रतिमा वाघ, प्रा. शाम जाधव,उपप्राचार्य प्रा. डॉ. दिलीप जाधव प्रा. डॉ. संजय पाटील,प्रा. सुनीता आडके, प्रा.पी.परमार,प्रा. डॉ. श्रद्धा रारावीकर प्रा. आहेर सविता, प्रा. शशिकांत अमृतकर,श्री.दिलीप हळदे आदी. मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला सुरुवात वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवत झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी गन, गवळण, लावणी, हिंदी, मराठी आणि दक्षिण भारतातील प्रसिद्ध गीतांवर डांस सादर केला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्काराला उपस्थितांनी मनमुराद दाद दिली. यावेळी देवळाली कॅम्प पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.