नाशिक रोड येथील जाधव हॉस्पिटलमध्ये डॉ. राजेंद्र जाधव यांनी एक अनोखी व अवघड शस्त्रक्रिया यशस्वी केली. गळ्याभोवती थायरॉईडच्या मोठ्या गाठीने त्रस्त झालेल्या व आता आयुष्य संपलं या निराशेच्या गर्तेतील ८० वर्षाच्या वृध्देवर नाशिक रोडच्या जाधव हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झाल्याने तीला पुनर्जन्म मिळाला.
जीवघेणा आजार, असाह्य वेदना, दीर्घ काळापासून श्वासाचा त्रास, अन्न गिळणेही वेदनादायी, पाणी पिणेही नकोस झालेलं, डोळे बाहेर आलेले, हृदयाची गती वाढलेली, अंगाचा थरकाप, मनाची अस्वस्थता वाढलेली. आठ वर्षापासून थायरॉईड कमी करण्यासाठी औषधांचा मारा सुरुच. त्यामध्ये पंचवीस वर्षापासून उच्च रक्तदाबाची गोळी या सर्व गोष्टींना कंटाळून शांताबाई राजाराम भालेराव या वृध्देने डॉक्टर काहीही झाले तरी चालेल पण ही गाठ काढून टाका अशी काकुळतेने विनंती केली. आजीची अवस्था बघून डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा धाडसी निर्णय घेतला.
आपल्या गळ्यात पाच बाय, दोन बाय, दीड सेंटीमीटरची थायरॉईडची गाठ असते. तीचे वजन वीस ते तीस ग्रॅम असते. थायरॉइड ग्रंथी सर्व पेशींमध्ये काम करत असते. अतिक्रियाशील होऊन थायरॉईड हार्मोन्सची जास्त प्रमाणात निर्मिती होते. शरीरातील मेटाबोलिझम गतिमान होऊन हृदयाची गती वाढणे, अंगाचा सतत थरकाप होणे, हात थरथरणे, मनाची अस्वस्थता वाढणे व वाढलेल्या गाठीमुळे अन्न व श्वास घेण्यास त्रास होणे याला एक्सोप्थाल्मोस असं म्हणतात. हे हार्मोन्स हृदय, मेंदू ,मूत्रपिंड, यकृत यासारख्या महत्त्वाच्या अवयवांना थेट परिणाम करतात.
शांताबाई राजाराम भालेराव यांना आठ वर्षापासून गळ्याभोवती गाठ होती. अतिक्रियाशील थायरॉईडची गाठ (हायपर थायरॉइडिजम) कमी करण्यासाठी गेल्या आठ वर्षापासून न्यूओमरक्याजोल दहा मिलीग्राम दिवसातून दोनदा घ्यावी लागायची. पंचवीस वर्षांपासून उच्च रक्तदाबाची औषधे त्यात रक्ताशय आठ ग्रॅम हिमोग्लोबिन.
सर्व तपासण्या तसेच मेडिकल फिटनेस डॉ. विजय घाडगे यांनी केल्या. दोन रक्त पिशव्या आणि संपूर्ण भूल देऊन भूलतज्ञ डॉ. कैलाश कोलते यांच्या सहकार्यातून शस्त्रक्रिया पार पाडली. त्यांना 25 सेंटीमीटर बाय 14 सेंटीमीटर बाय थायरॉईड ग्रंथी ४८० ग्रॅम वजनाची ग्रंथी काढण्यात यश आले. डॉ. माधुरी जाधव, डॉ. सुशांत जाधव, डॉ. तेजस्विनी जाधव, डॉ. अरुण बेहरे, डॉ. योगेश सिंघानी यांचीमदत झाली.
डॉ. जाधव आमच्यासाठी देवच
आमची आई आठ वर्षांपासून थायरॉईडच्या मोठ्या गाठीमुळे त्रस्त होती. ८० वय असल्याने शस्त्रक्रिया गुंतागुंतीची आणि संकटाना आमंत्रण देणारी होती. सर्वच नातेवाईक ऑपरेशनच्या विरुध्द होते. डॉ. राजेंद्र जाधव आमच्या कुटूबांशी अनेक वर्षांपासून संबंधीत आहेत. त्यांनी आम्हाला विश्वासात घेतले. डॉ. राजेंद्र जाधवांनी अवघड शस्त्रक्रिया यशस्वी केली. आईची तब्येत आता ठणठणीत आहे. डॉ. जाधव यांच्या रूपात आम्ही देव बघितला अशी प्रतिक्रिया शांताबाई भालेराव यांची मुले दिलीप, प्रदीप भालेराव, मुली माया कांबळे व सुनंदा साळवे यांनी व्यक्त केली.