त्रंबकेश्वर तालुक्यातील डहाळेवाडी या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बांधून पूर्ण आहे. त्यासाठी शासनाने सुमारे पाच कोटी रुपये खर्च केले आहे. या भागातील गोरगरीब आदिवासी जनतेला आरोग्याची सुविधा मिळावी म्हणून ही इमारत बांधण्यात आली. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून इमारत धुळ खात पडून आहे. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. येथे तातडीने डॉक्टर व इतर सहकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून आरोग्य केंद्र सुरू करावे, नाही तर प्रजासत्ताक दिनी एल्गार कष्टकरी संघटना जन आंदोलन छेडणार असल्याची माहिती संस्थापक भगवान मधे,तालुकाध्यक्ष वसंत इरते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विशेष म्हणजे या अतिदुर्गम भागातील रुग्णांना उपचार घेण्यासाठी जवळ कोणतेही हॉस्पिटल नसल्याने त्यांना त्रंबक, इगतपुरी, घोटी,नाशिक किंवा जवळच्या मोखाडा तालुक्यातील खोडाळा या ठिकाणी जिल्हा सीमा ओलांडून जाऊन खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे या भागातील आदिवासी कष्टकरी यांना आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. यांसाठी जिल्हा प्रशासनाने डहाळेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तात्काळ सुरू करावे या मागणीसाठी दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सकाळी अकरा वाजता एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
रिसॉर्टच्या बांधकामा प्रश्र्नी तक्रारीचा सूर
इगतपुरी – त्रयंबकेश्वर चे आमदार हिरामण खोसकर यांनी याबाबत लक्ष घालावे,वैतरणा धरणासाठी संपादित जमिनीवर बेकायदेशीर बांधकामे, धरणाच्या पाण्यात मातीचा भराव करून रिसॉर्टचे बांधकामे, वैतरणा धरणात मातीचा भराव टाकून बेकायदेशिर बांधकाम
रिसॉर्टचे मलमुत्र वैतरणा धरणात !
वैतरणा धरणाच्या कडेला असलेले रिसॉर्ट बांधकाम करताना धरणात मातीचा भराव टाकून व संपादित केलेल्या जमिनीवर बेकायदेशीरपणे बांधकाम केलेले दिसतात. येथील काही रिसॉर्टच्या मलमुत्राचे पाणी नेमके कुठे जाते याविषयी चर्चा केली जाते आहे. जर एखाद्या रिसॉर्टचे मलमुत्राचे पाणी थेट धरणात सोडले जात असेल तर ही बाब अतिशय गंभीर आणि आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक होऊ शकते. अश्या रिसॉर्ट चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.दरम्यान येथील बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करावी. याविषयी यलगार कष्टकरी संघटनेच्या वतीने अनेकदा तक्रारी केलेल्या आहेत. मात्र पाटबंधारे विभाग याप्रश्नी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून रिसॉर्ट माफी यांना पाठीशी घालत असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे.