311 Post Views
नाशिक रोड : उमेश देशमुख
हिंदू संस्कृती, समाज रक्षणासाठी जिजाऊ आणि शिवबांनी स्वराज्य उभे केले. रामराज्य आणले. शिवबा व स्वराज्य टिकले तर आपण टिकू या भावनेने समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला. शिवबांचे आदर्श राष्ट्र पुन्हा बनवायचे असेल तर त्यांचे तत्वज्ञान, चरित्र अंगीकारले पाहिजे. राष्ट्र, संस्कृती निर्माण करण्यासाठी जिजाऊंनी असमान्य त्याग केला. भारतीय संस्कृती, समाज रक्षण करणारे जिजाऊ व शिवबा हे राष्ट्रवादाचे जनक आहेत, असे प्रतिपादन शिवचरित्र व्याख्याते पांडुरंग बलकवडे यांनी केले.
अश्वमेध प्रबोधिनीच्या वतीने धामणकर सभागृह, पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल, नाशिकरोड येथे स्व. प्रा. यशवंतराव केळकर स्मृती व्याख्यानमालेत बोलतांना तेले.
यावेळी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष मारुतीराव कुलकर्णी, गारगोटी संग्रहालयाचे प्रमुख के. सी. पांडे, अश्वमेध प्रबोधिनीचे अध्यक्ष राजेश आढाव, सचिव ज्ञानेश्वर भोर, रविन्द्र शिंदे, निलेश आहिरराव आदी उपस्थित होते.
बलकवडे म्हणाले की, प्रथम व्यक्ती घडवावी लागते. नंतर ही व्यक्ती आदर्श समाज घडवते. हा समाजच आदर्श राष्ट्र घडवतो, हे ओळखून जिजाऊंनी शिवबाला घडवले. त्याला श्रीरामाचे चरित्र आणि कृष्णाची राजनिती शिकवली. शुक्र, चाणक्य व भीष्म निती शिकवली. अर्थ, न्याय, युध्द, दुर्ग शास्त्राचे धडे दिले. जनतेचे दुःख जाणण्यासाठी द-याखो-यात पाठवले. परकियांनी पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवून ते शापित केले. पण जिजाऊंनी बारा वर्षाच्या शिवबाला घेऊन पुण्यात सोन्यांचा नांगर फिरवून पुणे समृध्द केले. त्यामागे राष्ट्र व समाज उत्थान हाच उद्देश होता. सुवर्ण भारताचा परकियांनी विध्वंस केला. अन्न, वस्त्र, निवारा, धार्मिक अधिकार हिरावून घेतले. अशावेळी शिवसूर्याचा उदय झाला. मुस्लिम राज्यकर्त्यांनी ६६ टक्के जिझीया कर शेतीवर लावलेला असताना शिवरायांनी शेतजमीन लागवडी खाली आण-यांना पाच वर्ष करसवलत देऊन कृषी क्रांती घडवली. पिडीत जनतेला आपले धन-धान्य दिले. अन्नछत्रे सुरु केली. शिवबाची कृषीक्रांती आजच्या राज्यकर्त्यांसाठी आदर्श आहे.
