सात दिवसांच्या राष्ट्रीय शासकीय दुखवट्यात महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम ! आयोजन योग्य की अयोग्य याविषयी चर्चा
नाशिक महावितरण परिमंडळ विभागाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांची नुकतीच मुंबई येथील महावितरणच्या मुख्यालयात शासनाने बदली केली. त्यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम शुक्रवारी ( दि. २७ ) नाशिक – पुणे रोड लगतच्या सेलिब्रेटा सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान पार पडला. कार्यक्रमास बड्या अधिकारी अन् कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. देशाचे माजी पंतप्रधान मनोहन सिंह यांचे निधन झाल्याने देशात सात दिवसांचा शासकीय राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. कुमठेकर यांनी दुःखवट्याच्या काळात शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचा कार्यक्रम घेतल्याने याविषयी उलट सुलट चर्चा नाशिक परिमंडळात सुरू आहे.
कार्यक्रमाच्या व्हिडिओ बघा
देशभरात शासकीय दुखवटा जाहीर झाला आहे. त्यामुळे या काळामध्ये कोणत्याही प्रकारचे शासनाचे कार्यक्रम अथवा औपचारिक कार्यक्रम घेतले जात नाही. असे असताना नाशिक परिमंडळचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्या बदलीचा निरोप समारंभाचा कार्यक्रम कसा काय घेतला जाऊ शकतो, स्वतः दीपक कुमठेकर एक जबाबदार अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय शासकीय दुःखवट्याच्या काळामध्ये नेमके कुठले कार्यक्रम घेतात आणि कुठले कार्यक्रम घेतले जात नाही, याविषयी माहिती नाही का ?, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होताना दिसतो आहे. कुमठेकर यांची मुंबई येथे झालेली बदली प्रशासकीय कामकाजाचा किंवा व्यवस्थापनाचा एक भाग आहे. बदली झाल्यानंतर शासकीय कार्यालयांमध्ये निरोप समारंभाचा औपचारिक कार्यक्रम घेतला जात असल्याची प्रथा, परंपरा आहे. याविषयी कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. पण देशातील सात दिवसांच्या राष्ट्रीय दुखवटाच्या काळात कुमठेकरांचा झालेला निरोप समारंभाचा कार्यक्रम वादग्रस्त ठरू शकतो का ?, किंव्हा दिपक कुमठेकरांचा कार्यक्रम शासनाच्या मूल्य चौकटीत आणि नियमावलीत बसणार आहेत. याविषयी आता शासनाची प्रशासकीय यंत्रणा काय निर्णय घेणार याकडे महावितरण मधील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे.
राष्ट्रीय शासकीय दुखवटा म्हणजे काय
देशात सन्मानित एखाद्या व्यक्तिचं निधन झालं तर ती देशाची मोठी हानी मानली जाते. त्यामुळे राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला जातो. यापूर्वी केंद्र सरकारच्या शिफारशीवर राष्ट्रपती याची घोषणा करायचे. मात्र आता राज्य सरकारेही राजकीय शोक जाहीर करत असतात. राष्ट्रीय दुखवटा जाहीर केल्यानंतर राष्ट्रीय ध्वज संहितेच्यानुसार संसद, सचिवालय, विधानसभा आणि महत्त्वाच्या राष्ट्रीय भवन आणि सरकारी कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जातो. याशिवाय देशाच्या बाहेरील भारतीय दूतावासावरील राष्ट्रध्वजही अर्ध्यावर उतरवला जातो. या काळात कोणतेही सरकारी किंवा औपचारीक कार्यक्रम केले जात नाहीत.