Home Blog बापाने केली बिबट्याच्या जबड्यातून चार वर्षाच्या मुलाची सुटका ; बिबट्याचा पाय घट्ट...

बापाने केली बिबट्याच्या जबड्यातून चार वर्षाच्या मुलाची सुटका ; बिबट्याचा पाय घट्ट पकडून प्रतिकार केल्याने वाचला जीव !, विहितगाव शिवारातील घटना

0
8,848 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

येथील वडनेर – विहीतगाव रस्त्यालगत असलेल्या चौधरी डॉग फार्म येथे गुरुवारी ( दि. २६ ) रात्री आठ वाजेच्या दरम्यान एका चार वर्षाच्या मुलावर बिबट्याने अचानक हल्ला चढविला. बिबट्याने मुलाला आपल्या जबड्यात पकडून पसार होण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान वडिलांनी बिबट्याचा मागील पाय घट्ट पकडून ठेवला. बिबट्याने मुलाच्या वडिलांना देखील सुमारे शंभर ते दीडशे फूट फरफटत नेले. यानंतर प्रखर प्रतिकार होत असल्याचे पाहून बिबट्याने मुलाला सोडून पळ काढला. एखाद्या चित्रपटात शोभावा असा प्रसंग विहितगाव शिवारात घडला. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये दहशत निर्माण होताना दिसून येते आहे.

कु.ऋषिकेश प्रकाश चंद्रे ( वय ४ , राहणार डॉ. चौधरी डॉग फार्म ) असे बिबट्याने हल्ला केलेल्या लहान मुलाचे नाव आहे. गुरुवारी रात्री आठ ते सव्वा आठ वाजेच्या दरम्यान ऋषिकेश चंद्रे घराजवळ होता. त्यावेळेस अचानक आलेल्या बिबट्याने ऋषिकेशवर हल्ला केला. ऋषिकेश यास आपल्या जबड्यात पकडून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान जवळच असलेले ऋषिकेशचे वडील प्रकाश चंद्रे यांनी समयसूचकता दाखवत बिबट्याचा मागचा पाय घट्ट पकडून धरला. बिबट्याला रोखून धरण्याचा प्रयत्न पुर्ण ताकतीनिशी केला. बिबट्याला रोखून धरत आपल्या मुलाची सुटका करण्याचा आटापिटा ऋषिकेशचे वडील प्रकाश चंद्रे यांनी केला सुरू ठेवला. यादरम्यान झालेला आरडा – ओरडा आणि तीव्र प्रतिकार होत असल्याचे पाहून बिबट्याने ऋषिकेशला आपल्या जबड्यातून मुक्त केले. आणि तिथून पळ काढला.वडिलांनी जीव धोक्यात घालून आपल्या चार वर्षाच्या मुलाचा जीव वाचविण्याचा थरार डॉ. चौधरी फार्म येथे घडला. यानंतर बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या ऋषिकेशला स्थानिक नागरिकांच्या मदतीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सद्या ऋषिकेश याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

तातडीने पिंजरा बसवा : विक्रम कोठुळे

वडनेर – विहितगाव शिवारात कायमस्वरूपी बिबट्याचा वावर असतो. येथे असलेली शेती, वालदेवी नदी आणि लष्कराचे जंगल असे बिबट्याला पोषक वातावरण आहे. त्यामुळे येथे कायमस्वरूपी बिबट्याचा संचार असतो. वन विभागाने डॉग फार्म येथे झालेल्या चिमुरड्यावरील हल्ल्याची दखल घ्यावी, येथे तातडीने पिंजरा बसवावा, अशी मागणी राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते विक्रम कोठुळे यांनी केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version