450 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभागाने तंत्रज्ञ -३ वर्गाच्या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये कर्ण आणि एक पाय बाधित प्रवर्गातील उमेदवारांसाठी तीन टक्के आरक्षण ठेवलेले नसल्याचे जाहिरातीमधून स्पष्ट झाले आहे. याप्रश्नी आपण तातडीने दखल घेऊन तीन टक्के जागेचे आरक्षण ठेवण्यात संबंधितांना सुचित करावे, अशा मागणीचे निवेदन देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांनी अधिवेशना दरम्यान उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना दिले.
महाराष्ट्र शासनाच्या उर्जा विभागाने वर्तमान पत्रात जाहिरात ( क्र. ०४/२०२४ ) प्रसिद्ध केली आहे. यामध्ये दिव्यांगाच्या आरक्षणामध्ये एक पाय बाधित या दिव्यांग प्रकारात समावेश नाही. जाहिरातीद्वारे झालेल्या नोकर भरतीमध्ये अपंग उमेदवाराकरिता तीन टक्के प्रमाणे प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी यांना ३३६ जागांपैकी ११ जागा अपंग उमेदवारांमधून भरण्यात आलेल्या आहेत. परंतु अपंग प्रवर्गामध्ये कर्णबधीर आणि ( (OC) One Leg affected ) एक पाय बाधित उमेदवारांकरिता जागा आरक्षीत ठेवण्यात आलेल्या नसल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी सहानुभूतीपूर्वक विचार करुन कर्ण व एक पाय बाधित दिव्यांग बांधव उमेदवारांच्या भरतीसाठी शासनाच्या सर्वच विभागामध्ये तंत्रज्ञ-३ पदाकरिता समायोजन करणेबबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याची विनंती आमदार सरोज अहिरे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना दिलेल्या निवेदनामध्ये करण्यात आलेली आहे.
अजितदादांचा ऊर्जा सचिवांना भ्रमणध्वनी
आमदार सरोज अहिरे यांनी ऊर्जा विभागातील नोकर भरती संदर्भात दिवांग्य प्रवर्गातील तीन टक्के राखीव जागेच्या आरक्षण संदर्भात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना लेखी निवेदन दिले. याप्रश्नी उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी तातडीने दखल घेतली. ऊर्जा विभागाचे अप्पर मुख्य सचिव आभा शुक्ला मॅडम यांच्यासोबत दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. सदर विषयाबाबत आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे लवकरच दिव्यांग उमेदवारांना न्याय मिळू शकतो.
