बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेले अत्याचारथांबविण्याच्या मागणीचे निवेदन शिवसेना (उबाठा) तर्फे सोमवारी ( दि. १६ ) विभागीय महसुल आयुक्त प्रविण गेडाम यांना देण्यात आले. निवेदनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रश्नी तातडीने हस्तक्षेप करावा, हिंदूवरील हल्ले आणि हिंदू देव देवतांची विटंबना रोखण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी प्रामुख्याने मागणी आहे.
निवेदनातील आशय असा, बांगलादेशाच्या पतंप्रधान शेख हसीना यांना सत्तेतून हटवल्यानंतर अल्पसंख्य समुदाय म्हणजेच हिंदूवर हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. नुकतेच चिन्मय कृष्णदास यांना राजद्रोहाच्या खटल्याखाली अटक केली. या घटनेनंतर हिंसाचार उफाळून आला. बांगलादेश ध्वजाच्या कथित अपमानाचा आरोप त्यांच्यावर आहे. यामुळे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर संताप व्यक्त होत आहे. ढाका येथील इस्कॉन नमहट्टा मंदिरावर हल्ला झाला. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यादरम्यान मंदिराची तोडफोड झाली. हिंदू देवतांच्या मूर्ती पेट्रोल टाकून जाळण्यात आल्या. बांगलादेशातील सध्याच्या परिस्थितीने शेजारील देशांमध्ये चिंता निर्माण केली आहे. अल्पसंख्यांकांच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर कडक पावले उचलण्याची मागणी जोर धरत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
याप्रसंगी शिवसेना सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे, महानगर प्रमुख विलास शिंदे, शैलेश सूर्यवंशी, मसूद जिलानी, किरण उहाले, विजय काळदाते, डी.जी. सूर्यवंशी, राजेंद्र ताजणे, संदेश फुले, विजय भालेराव, भैय्या मनियार आदी. उपस्थित होते.