Home Blog पुतण्याच्या उपद्रव ! ; काकांचा मंत्रिपदाचा पत्ता कट ! ; अन् माणिकराव...

पुतण्याच्या उपद्रव ! ; काकांचा मंत्रिपदाचा पत्ता कट ! ; अन् माणिकराव कोकाटे यांना लॉटरी !

0
11,197 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी रविवारी ( दि.१२ ) नागपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यात नाशिक जिल्हयाचे माजी पालकमंत्री तथा ओबीसी समाजाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना स्थान मिळाले नाही. त्यामुळे नाशिकसह सर्व महाराष्ट्रात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भुजबळ यांना उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी मंत्रिमंडळात स्थान का दिले नाही, याविषयी चर्चेला उधाण येते आहे. पुतणे समीर भुजबळ यांनी बंडखोरी करीत नांदगाव मतदार संघातून अपक्ष निवडणुक लढविली. त्याचा परिणाम म्हणून छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर बसावे लागले. असा चर्चेचा सूर राजकीय पटलावर उमटताना दिसतो. दरम्यान या सर्व घडामोडीत मंत्रीपदाची लाभ मात्र सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांना मिळालेला दिसतो.

प्रतिष्ठा, मानसन्मान मिळाला

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी छगन भुजबळ यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांच्यावर मोठ्या विश्वासाने मुंबई शहराच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्यांमध्ये पुत्र पंकज भुजबळ यांची वर्णी लावत आमदार केले. स्वतः राज्याचे कॅबिनेट मंत्री, पुतण्या मुंबई शहराचा अध्यक्ष अन् पुत्राची विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती असे सर्व काही सोयीस्कर व अलबेल परिस्थिती माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या बाजूने राष्ट्रवादीत होती. राष्ट्रवादीत मानाचे पान अन् सन्मान होता, प्रतिष्ठा होती, शब्द प्रमाण होता.

पक्षाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न

पण पुतणे समीर भुजबळ यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षासोबत बंडखोरी केली. महायुतीचा धर्म पाळला नाही. नांदगाव विधानसभा मतदार संघातून महायुती मधील आघटकपक्ष असलेल्या शिवसेनेचे उमेदवार आमदार सुहास कांदे यांच्या समोर अपक्ष म्हणून निवडणूक लढवत बंडखोरी केली. यामुळे कांदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला गेला. परिणामी शिवसेनेने देखील दिंडोरी विधानसभा मतदार संघात धनराज महाले आणि देवळाली मध्ये राजश्री अहिरराव यांना उमेदवारी दिली. यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला गेला. तो केवळ समीर भुजबळ यांच्या अट्टाहासामुळे. राष्ट्रवादी आणि पक्षाचे अधिकृत उमेदवार यांना अडचणीत आणण्याचा प्रकार घडला.

निवडणुकी अगोदर वेगळे अन् नंतर एकत्र

निवडणुकी नंतर समीर भुजबळ हे काका छगन भुजबळ यांच्या सोबत सर्रासपणे वावरताना महाराष्ट्राने पाहिले. जणू काही घडलेच नाही, असा आविर्भाव दोघांमध्ये दिसत होता. निवडणुकीच्या अगोदर वेगळे अन् निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र असे चित्र स्पष्ट झाले. त्यामुळे एक वेगळा संदेश राज्याच्या राजकारणात गेला. परिणामी काकांना ज्येष्ठ, श्रेष्ठ असूनही मंत्रिपदास मुकावे लागले. अशी चर्चा त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात दिसून येते आहे.

भुजबळ विदेश दौऱ्यावर जाणार !

छगन भुजबळ कुटुंबासोबत विदेश दौऱ्यावर जाणार असल्याची चर्चा आहे. तपास यंत्रणेने जप्त केलेला त्यांचा पासपोर्ट परत करावा ,असे आदेश न्यायालयाने तपास यंत्रणेला दिले आहेत. त्यामुळे भुजबळ लवकरच कुटुंबासोबत विदेश दौऱ्यावर जाऊ शकतात,असे बोलले जाते आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version