710 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आमदार अँड राहुल ढिकले यांच्या विरोधात मी मागील निवडणुकीत उभा होतो. यावेळेला त्यांच्या बाजूने आहे. त्यांना मी शब्द दिलाय,पैसा सर्वस्व नसतो, यंदाची निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी असून तुम्हाला पुन्हा एकदा प्रचंड मतांनी निवडून आणून दाखविणार आहे. त्यासाठी मला कोणताही त्याग करावा लागला तरी चालेल,असे प्रतिपादन माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी केले.
नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आमदार अँड राहुल ढिकले यांच्या नाशिकरोड येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी ( दि.९ ) सायंकाळी शकुंतला करावा यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी माजी आमदार बाळासाहेब सानप, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, शिवसेना शिंदे गटाचे उपनेते विजय करंजकर, आरपीआय आठवले गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कवाडे सर गटाचे शशिकांत उन्हवणे, निवृत्ती अरींगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.माजी आमदार सानप पुढे म्हणाले की, राजकारणात आपल्याला कुठे थांबावे अन कुठे लढावे, याची समज असावी लागते. हल्ली त्याऐवजी पैसा हाच निकष लावला जात असल्याची खंत सानप यांनी बोलून दाखवली. महायुतीचे उमेदवार ढिकले यांनी पैसाच सर्वस्व असते तर पंतप्रधान मोदी ऐवजी टाटा आणि अंबानी देशाचे पंतप्रधान असते. असे म्हटले.सूत्रसंचालन राजेश आढाव यांनी केले. आभार विक्रम कदम यांनी मानले.
