शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक तथा स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते यांना तर देवळाली विधानसभा मतदार संघामधून राजश्री अहिरराव यांना उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.
मागील अनेक दिवसापासून देवळाली आणि नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार ?, याविषयी तर्क, वितर्क लढविले जात होते. मागील तीन ते चार दिवसापासून सर्व इच्छुक उमेदवार मुंबई येथे उमेदवारीसाठी तळ ठोकून होते. त्यामुळे उमेदवारी नेमकी कुणाला मिळेल, याविषयी प्रचंड उत्सुकता होती. सोमवारी दिवसभरात घडलेल्या घडामोडीमध्ये नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघामधून गणेश गीते यांना तर देवळाली विधानसभा मतदार संघामधून राजश्री अहिरराव यांना उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती हाती येत आहे. त्यामुळे दोघांच्याही समर्थकांनी जल्लोष सुरू केला आहे.
यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचा सुर
देवळाली विधानसभा मतदार संघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असलेले लक्ष्मण मंडाले आणि योगेश घोलप यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसतो आहे. देवळालीत राजश्री अहिराव यांना उमेदवारी निश्चित झाल्यामुळे या दोघांचे समर्थक नाराज असल्याचे दिसून येत आहे. तसेच नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये जगदीश गोडसे आणि अतुल मते यांच्या समर्थकांमध्ये देखील काहीसा नाराजीचा सूर उमटताना दिसतो आहे. मागील चार दिवसापासून सर्वजण मुंबई येथे तळ ठोकून आहे.