नाशिकरोड : उमेश देशमुख
नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघ पूर्वीपासून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा मतदारसंघ मानला जातो. येथे काँग्रेसला मानणाऱ्या विचारसरणीचे सर्वाधिक मतदार आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मतदारसंघावर दावा केला. त्यामुळे काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा नाराजीचा सुर दिसतो. काँग्रेसला मतदार संघ सुटला नाही तर येथे सांगली पॅटर्नची पुनःवृत्ती होऊ शकते, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.
मतदारसंघात राजाराम पानगव्हाणे, शरद आहेर, विजय राऊत, संदीप शर्मा इच्छुक आहे. त्यांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी दावा केलेला आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदार संघ सुटणार असल्याच्या अविर्भावात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहे. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना हे पदाधिकारी विचारायला तयार नाही. आमच्या पक्षाची ताकद असताना आम्ही आमच्या हक्काचा मतदारसंघ राष्ट्रवादीला कश्यासाठी सोडायचा, असा सवाल काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आहे. काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य दखल घेतली नाही तर येथे काँग्रेसने देखील उमेदवार उभा करावा, सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती करून नाशिक पूर्व मतदार संघात आमचा उमेदवार निवडूण आणून दाखवू शकतो. असे पंचवटी आणि नाशिकरोडच्या पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. याप्रश्नी लवकरच नाशिक रोड आणि पंचवटी विभागातील कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहोत, त्यामध्ये सांगली पॅटर्न विषयी चर्चा करून पदाधिकाऱ्यांना आमचा निर्णय कळविणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
उमेदवारी कुणालाही द्या,आम्ही निवडूण आणू
काँग्रेसकडून राजाराम पानगव्हाणे, शरद आहेर, विजय राऊत व संदीप शर्मा यांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी दावा केला आहे. यापैकी पक्षाने कुणालाही उमेदवारी द्यावी, आम्ही एकजुटीने त्यांच्या पाठीमागे उभे राहून त्यांना निवडून आणून दाखवू, असा आत्मविश्वास मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी बोलून दाखविला. काहीही करा, नाशिक पूर्व मतदार संघ हा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वाट्याला मागून घ्या, अशी मागणी देखील या निमित्ताने पुढे येताना दिसते.
होय काँग्रेसचाच मतदार संघ
२००९ मध्ये राजाराम पानगव्हाणे, २०१४ मध्ये उध्दव निमसे, २०१९ मध्ये गणेश उन्हवणे उमेदवार होते. त्यामुळे मतदार संघाच्या निर्मितीपासून यावर आमचाच हक्क आहे, असा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे.