भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक तथा महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते सध्या मुंबईत तळ ठोकून आहे. कोणत्याही परिस्थितीत त्यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावयाचा आहे. त्यासाठी ते नेत्यांची गाठीभेटी घेत आहे. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा देखील नाशिक शहरात होऊ लागले आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून तयारी करीत असलेले जगदीश गोडसे आणि अतुल मते यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे. ऐनवेळी गणेश गीते यांना जर उमेदवारी दिली तर नाराजीचा मोठा सामना राष्ट्रवादीला नाशिक पूर्व मधून करावा लागू शकतो, असे राजकीय पटलावर बोलले जाते आहे.
गीते हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जातात.शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना प्रवेश देऊन नाशिक पूर्व मधून उमेदवारी दिली तर राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहायला मिळू शकते. मागील काही वर्षापासून गोडसे आणि मते यांनी मतदार संघात तयारी केलेली आहे.मतदारसंघात पक्ष घराघरापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला. वेगवेगळे कार्यक्रम घेऊन त्यांचा खर्चही केला आहे. पक्षांमध्ये प्रामाणिकपणाने प्रचार करणाऱ्या आणि शरद पवार यांच्या सोबत निष्ठा असलेल्या इच्छुक उमेदवारांना उमेदवारी मिळत नसेल तर त्याचा विपरीत परिणाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या देवळाली, सिन्नर आणि येवला मतदार संघावर होऊ शकतो, असे गीते यांच्या चर्चेने संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये बोललेले जात आहे. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाशिक पूर्व मतदार संघात नेमकी कुणाला उमेदवारी देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गीते यांना उमेदवारी दिली तर पक्षातील अंतर्गत नाराजी, कलह कशाप्रकारे दूर करायचा, असा मोठा प्रश्न पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुढे निर्माण होईल. त्यामुळे पवार हे खरोखर गीते यांना उमेदवारी देतात की नाही , ते पाहण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागणार आहे. जगदीश गोडसे आणि अतुल मते तसेच गणेश गीते तिघेही मुंबई येथे असून प्रत्येकाने उमेदवारी आपल्याला मिळावी, यासाठी जोरदार फिल्डिंग लावलेली आहे. त्यामुळे शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघांमधून कोणाला उमेदवारी देईल, याकडे आता राजकीय जाणकारांचे लक्ष लागून आहे.
गीते शरद पवार यांच्या सोबत राहतील का
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गीते यांना उमेदवारी दिली तर गीते हे पाच वर्ष शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राहतील की नाही, याविषयी देखील चर्चा रंगत आहे. त्यामुळे गीते यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा चर्चेचा विषय बनू पाहत आहे.